Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेचा जनसंपर्क बळकट करण्यासाठी वाशिममध्ये जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन



खा. संजय देशमुख यांच्या पुढाकारातून पक्ष संघटनाला नवे बळ; खा. अरविंद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण


वाशिम, दि. १२ जुलै
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार खा. संजय देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या जनसंपर्काची दिशा निश्चित करणारे वाशिम येथील जनसंपर्क कार्यालय शनिवारी माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खा. अरविंद सावंत यांच्या हस्ते लोकार्पित झाले. या सोहळ्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष संघटनाला नवे बळ मिळणार आहे.

कार्यक्रमासाठी वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना खा. अरविंद सावंत म्हणाले, "लोकशाहीत खऱ्या अर्थाने संवाद साधण्याची परंपरा शिवसेनेनं जपली आहे. हे कार्यालय जनतेच्या अडचणी समजून घेण्याचं आणि त्या सोडवण्याचं केंद्र बनेल, असा मला विश्वास वाटतो."

खा. संजय देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "वाशिम जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क वाढावा, त्यांच्या समस्या पक्षमार्फत सोडवता याव्यात, यासाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. शिवसेना ही फक्त निवडणूकवेळी नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात कायम साथ देणारी संघटना आहे, हे आम्ही कृतीतून दाखवून देणार आहोत."

या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना संपर्क प्रमुख दिलीपराव जाधव, सहसंपर्क प्रमुख डॉ. सुधीर कावर, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ देवळे, लोकसभा संघटक कॅ. प्रशांत सुर्वे, माजी जिल्हाप्रमुख राजेश पाटील राऊत, महिला जिल्हा संघटिका सौ. मंगलाताई सरनाईक, युवा सेना जिल्हाधिकारी नितीन मडके, जुबेर मोहनावाले यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यालयाच्या स्थापनेमुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्यास गती मिळेल, तसेच जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रीत करता येईल, अशी भावना शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय कार्यकर्त्यांना दिशा देणारे आणि नियोजन केंद्र ठरणार आहे, यात शंका नाही.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर मोहनावाले यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी केले.
उद्घाटनानंतर शिवसैनिकांनी एकमुखाने नारा दिला – "शिवसेना चालली गावाकडे, जनता आली शिवसेनेकडे!"



Post a Comment

0 Comments