Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा विरोधात धडाकेबाज कारवाई – सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त


वाशिम, १४ जुलै २०२५: जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे यांच्या कडक धोरणांचा परिणाम आता प्रत्यक्षात दिसून येत आहे. "जिल्ह्यात अवैध धंदे खपवले जाणार नाहीत" या त्यांच्या इशाऱ्यानंतर पोलीस दल अधिक सजग झाला असून, त्याचाच एक प्रत्यय म्हणजे आज स्थानिक गुन्हे शाखेने केलेली धडाकेबाज कारवाई.

श्री. प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक (स्थानीय गुन्हे शाखा) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वाशिम-अकोला जिल्ह्याच्या हद्दीवर गुटख्याची मोठी खेप जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, टिमने तात्काळ पेट्रोलिंग सुरू केले. तपासणीदरम्यान मेडशी टी-पॉईंटवरील जयभोले ढाब्याजवळ एक संशयित महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप वाहन थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखू आढळून आले.

या कारवाईत अब्दुल सादिक अब्दुल रफीक (वय २६, रा. शिवणी, अकोला) या आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे ₹६,७६,४६०/- किंमतीचा गुटखा व तंबाखू आणि ₹९,००,०००/- किंमतीचे वाहन असा एकूण ₹१५,७६,४६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी हा सर्व माल मालेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड व सहायक पोलीस अधिक्षक श्री. नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे, अंमलदार विनोद सुर्वे, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संतोष वाघ व संपूर्ण स्थागुशा पथकाने मोलाचे योगदान दिले.

पोलीस दलाच्या या तत्परतेमुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांना चाप बसणार असून, या कारवाईचे वरीष्ठ पातळीवरूनही कौतुक करण्यात येत आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध पोलीस प्रशासन आता अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments