✍️ संपादक : सुधाकर चौधरी,
आई-बापाचं स्वप्न असतं –
की मुलांनी कमवावं, मोठं व्हावं, नाव व्हावं...
पण त्याच मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात पाठवावं, हे या जन्माचं शाप आहे का?
काल कोर्टात गेलो होतो...
सामान्य एक वडील त्यांच्या थरथरत्या हातांनी एक अर्ज घेऊन माझ्यासमोर आले.
डोळ्यांत अश्रू होते, पण आवाजात राग नव्हता — होता फक्त खचलेला आत्मा...
"साहेब, मुलाचं लग्न करून दिलं, नोकरी लावली, शिक्षणासाठी जमीन विकली...
आणि आज आम्हालाच घरातून हाकलून दिलं!"
हा केवळ एकाच बापाचा सवाल नाही,
तर हजारो आई-बापांच्या काळजात उठणारी जळजळती आर्त हाक आहे.
जी पोटासाठी उपाशी राहिली,
तीच आई आज मुलाच्या सुखाच्या वाटेत अडथळा वाटते...
आणि जी रात्रंदिवस कष्ट करून घर उभं करत गेली,
ती बापाची काठी आता घराबाहेर फेकली जाते...
आजची पिढी कमावतेय, प्रगती करतेय,
पण माणूस म्हणून मातीत खोल रुजलेली मुळं मात्र हरवत चाललीये.
प्रेमात जेवढं अंधत्व दाखवतो,
तेवढं जर आईच्या पायावर मस्तक ठेवून दाखवलं असतं,
तर कदाचित देव सुद्धा हसून आशीर्वाद दिला असता!
एका आई-बापाने जीव तोडून वाढवलेली लेकरं,
लग्न झाल्यावर बायकोच्या सांगण्यावरून आई-वडिलांना घरातून हाकलतात —
कधी कारण कर्जाचं, कधी नात्यांचं, तर कधी फक्त "नकोसं वाटतं!"
हेच का ते संस्कार?
जिथे प्रेमच नाही, तिथे प्रगतीचा काय उपयोग?
जिथे घरात देव्हाऱ्यात देव आहेत, पण आई-बाप नाहीत —
तिथे पापाचं ओझंच वाढतं...
ही वेळ अजून गेली नाही.
आई-वडील जिवंत असताना त्यांची कदर करा.
त्यांच्या शब्दांमध्ये देव आहे, त्यांच्या हाकेत आशिर्वाद आहे.
सुख मिळवताना आपल्या मूळांचा विसर पडू देऊ नका,
नाहीतर आयुष्याच्या एखाद्या वळणावर तुम्हीच अनाथ व्हाल...
**"आई-बाप ही सावली असते –
ती कायमस्वरूपी नसते,
पण त्यांच्या जाण्यानंतर ती सावली शोधूनही सापडत नाही!"
"दिवा घरात असताना त्याचं तेज का हरवतं?"
प्रत्येक दिव्याखाली अंधार असतो,
यात शंका नाही —
पण तोच दिवा जर आळ्यावर बांधला,
तर घर पेटल्याशिवाय राहत नाही…
ही ओळ फक्त शब्द नाहीत,
तर हजारो आई-बापांच्या अंत:करणातून उमटलेली जळजळती शंका आहे!
आई-वडील घरात असतात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत वाटत नाही,
पण त्यांची गैरहजेरी हेच शिकवते —
की ज्यांनी आपल्यासाठी जीवन पेटवलं,
त्यांच्याशिवाय घर "घर" राहत नाही.
आईच्या पदराखाली जपलेलं सुख,
वडिलांच्या सावलीत मिळालेलं बळ —
यांची आठवण तेव्हाच येते,
जेव्हा घरात फर्निचर असतं पण प्रेम नसतं…
आजचं सत्य आहे की,
दिवा घरात असतो, पण अंधार वाढतो —
कारण त्याच दिव्याला कोपऱ्यात ठेवून
नव्या चकचकीत लाईट्सकडे बघत बसलोय!
आई-बाप ही वीज असते,
जी सर्दीत उब, ऊन्हात सावली देते —
पण त्याच झगमगाटात ती आपोआप झाकोळली जाते…
जरा थांबा, विचार करा —
आत्ताच जर त्या दिव्याला मान दिला,
तर पुढे आळ्यावर नेण्याची वेळच येणार नाही!
**"ज्यांच्या हातात सर्जा-राजा घेऊन आपण खेळलो,
त्या हातांना वृद्धाश्रमाचं दार दाखवणं —
ही आपलीच हार आहे!"
✍️ : सुधाकर चौधरी
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक
0 Comments