वाशिम तालुका प्रतिनिधी | सुपखेला :
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या संत तुकाराम महाराजांच्या संतवाणीप्रमाणे वृक्षलागवडीबरोबरच वृक्षांचे संगोपन ही काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा, सुपखेला येथे पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
आषाढ महिन्यानिमित्त आयोजित या वृक्षदिंडीस शाळेचे प्राचार्य सी. एम. ठाकरे आणि उपप्राचार्य एस. बी. चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. टाळ, मृदुंग आणि घोषवाक्यांच्या गजरात निघालेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी “वृक्ष लावा, वृक्ष वाचवा”, “निसर्ग वाचवा, जीवन वाचवा” असे घोष देत गावकऱ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचविला.
वृक्षदिंडीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य ठाकरे म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरी, शेतावर आणि शाळेच्या परिसरात किमान दोन वृक्ष लावावेत व त्यांचे जपणूककर्ते बनावे.” त्यांनी वृक्षांच्या संवर्धनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली.
या उपक्रमात राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्य एस. एस. मोळके, एम. एन. वानखेडे, एस. पी. नंदकुळे, जी. टी. मोरे, बी. व्ही. देशमुख, एन. ए. पडघान, एस. बी. पांडे, रामदास हमाने तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सुपखेला गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी आत्मीयता निर्माण झाली. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याचे प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी कळविले आहे.
0 Comments