मंगरूळपीर, दि. २० फेब्रुवारी २०२६ (सुधाकर चौधरी)
"मरावे परी कीर्तिरूपे उरावे" या उक्तीचा प्रत्यय देणारा आदर्श उपक्रम मंगरूळपीर शहरात साकार झाला आहे. कारंजा रोड येथील दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीचा कायापालट नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांच्या स्वयंप्रेरणेने व लोकसहभागातून करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून नव्याने विकसित करण्यात आलेल्या परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी आकाश वर्मा, नगराध्यक्ष अशोक भाऊ परळीकर, शिक्षण सभापती प्रा. वीरेंद्र सिंग ठाकूर, गटनेते गणेश भाऊ खोडे, बांधकाम सभापती गणेश भाऊ बजाज, सचिन पवार, उमेश भाऊ भोजने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सेवा जिथे निस्वार्थ, तिथेच खऱ्या कार्याची ओळख ठरते,
अंतिम प्रवासालाही ज्यांनी दिला सन्मान, त्यांची कीर्ती सदैव दरवळते.
वृक्षांच्या छायेतून उमलतो संवेदनांचा हा संदेश नवा,
कर्तव्य, करुणा आणि कृतज्ञता — हाच खरा विकासाचा ठेवा!"
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी आकाश वर्मा यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे नगरपरिषदेच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांना नवे बळ मिळाले आहे. अल्पावधीतच प्रशासनाला गती देत त्यांनी विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण केला असून विकासकामांना ठोस दिशा दिली आहे. स्मशानभूमी विकास उपक्रमाची पाहणी करताना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या प्रेरणादायी कार्यपद्धतीमुळे नगरपरिषद प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
लोकसहभागातून घडले परिवर्तन
अनिल भाऊ गावंडे यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमीत स्वच्छता, सुशोभीकरण, वृक्षलागवड, बसण्याची व्यवस्था तसेच परिसरात शिस्तबद्ध रचना करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनीही या कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमानंतर अनिल भाऊ गावंडे यांनी मुख्याधिकारी आकाश वर्मा यांचा नगरपरिषदेतील विविध विभागांमध्ये कमी कालावधीत प्रभावी प्रशासकीय कामकाज, कर्मचाऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये निर्माण केलेली शिस्त आणि कार्यतत्परता याबद्दल गुणगौरव करून सत्कार केला.
तसेच नगराध्यक्ष अशोक भाऊ परळीकर, शिक्षण सभापती प्रा. वीरेंद्र सिंग ठाकूर, गटनेते गणेश भाऊ खोडे, बांधकाम सभापती गणेश भाऊ बजाज, उमेश भाऊ भोजने आदींचाही सत्कार करण्यात आला.
“निस्वार्थ सेवेचा आदर्श”
यावेळी नगराध्यक्ष व शिक्षण सभापती यांनी अनिल भाऊ गावंडे यांच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक करताना “मरावे परी कीर्तिरूपे उरावे” या उक्तीप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात याहीपेक्षा अधिक उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या हातून घडावी, अशा शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
स्वच्छता दूतांचा गौरव
स्वच्छता विभागातील अधिकारी विनय वानखेडे, गजानन तिडके यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. स्वच्छता विभागातील कंत्राटी मसनजोगी संतोष यांचा स्वच्छता विषयक उत्कृष्ट कार्याबद्दल “स्वच्छता दूत” म्हणून गौरव करण्यात आला.
तसेच गेल्या १५ वर्षांपासून हिंदू स्मशानभूमीत अंतिम यात्रेच्या वेळी सेवा देत परिसर स्वच्छ ठेवणारे संतोष घनसरवाड यांना “स्वच्छ भारत मिशन (अर्बन) स्क्रोल ऑफ ऑनर” अंतर्गत “स्वच्छता दूत” म्हणून मुख्याधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचेही सुशोभीकरण व्हावे या उद्देशाने बाळू पाटील यांनी उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या खर्चातून सुमारे ५७ हजार रुपये खर्च करून त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली. या हरित उपक्रमामुळे स्मशानभूमी परिसराला केवळ सौंदर्याचीच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाचीही जोड मिळाली आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कृतीमुळे परिसरात हिरवाईची नवी उमेद फुलली असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले जात आहे.
आईच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श संजय मिसाळ यांनी घालून दिला आहे. आपल्या मातोश्रींच्या आठवणीप्रित्यर्थ त्यांनी स्मशानभूमीत सुमारे पाच लाख रुपयांच्या खर्चातून अत्याधुनिक थ्री-फेज लाईटिंग व्यवस्था उभारली. या प्रकाशयोजनेमुळे परिसर उजळून निघाला असून रात्रीच्या वेळी अंत्यविधींसाठी येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि समाजाभिमुख योगदानामुळे स्मशानभूमी विकास उपक्रमाला नवे तेज प्राप्त झाले आहे.
शहरासाठी आदर्श उपक्रम
मंगरूळपीर शहरातील स्मशानभूमीचा झालेला हा कायापालट अनिल भाऊ गावंडे यांच्या कार्यतत्परतेचे आणि समाजहिताच्या दृष्टिकोनाचे कौतुक करत, “हीच खरी लोकप्रतिनिधीची ओळख” असे मत व्यक्त केले.
मंगरूळपीरमध्ये साकारलेला हा स्मशानभूमी विकास उपक्रम केवळ एका ठिकाणाचा कायापालट नसून सामाजिक जबाबदारीची जाणीव जागवणारा संदेश ठरत आहे. उपनगराध्यक्ष अनिल गावंडे यांनी केलेले हे कार्य देशासाठी आदर्श ठरावे, अशीच नागरिकांची भावना व्यक्त होत आहे.
0 Comments