Ticker

6/recent/ticker-posts

वाशिमच्या सायकलपटुंची मध्यप्रदेशात सायकल जनजागृती

वाशिमच्या सायकलपटुंची मध्यप्रदेशात सायकल जनजागृती
अकरा जण सुपर रंडोनिअर्स पदकाचे मानकरी
सहाशे किलोमिटरची सर्वात लांब अंतराची सायकल मोहीम
वाशिम रॉदीनर व वाशिम सायकलस्वार ग्रुपचे आयोजन
वाशिम - मानवी स्वप्नाला इच्छाशक्तीचे पंख असल्यास अशक्यप्राय कार्यही तो लिलया करु शकतो याचा प्रत्यय वाशिमच्या सायकलस्वारांकडे पाहिल्यास दिसून येते. आजच्या यांत्रिक युगात केवळ सायकलच मानवाला वाचवु शकते हा दैवी संदेश सोबत घेवून वाशिमच्या सायकलस्वारांनी न थांबता न थकता सलग ६०० किलोमिटर सायकल चालवून महाराष्ट्र राज्यातुन थेट मध्यप्रदेश राज्यापर्यत धडक मारुन तेथे वाशिमचे नावलौकीक केले. या सर्वात मोठ्या सायकल राईडमध्ये एका महिला डॉक्टरसह १४ सायकलपटूंनी हिरीरीने भाग घेतला तर यापैकी ११ जण सुपर रंडोनिअर्स पदकाचे मानकरी ठरले. गेल्या सहा वर्षापासून ब्रेवेट स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना सायकलव्दारे पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणार्‍या वाशिम सायकलस्वार ग्रुप व वाशिम रॉदीनर ग्रुपच्या वतीने शनिवार, २३ ऑक्टोंबर रोजी या मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक पाटणी चौक येथे सकाळी ६ वाजता मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. वाशिम सायकलस्वार ग्रुपचे संस्थापक आदेश कहाते यांनी सायकलपटुंना हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर वाशिम ते मंगरुळपीर, कारंजा, अमरावती, मोर्शी, वरुड नंतर मध्यप्रदेश राज्यातील पांढूरणा, सावरेन अशी ६०० कि.मी. सलग सायकल चालवत ४० तासामध्ये सायकलपटु त्याच मार्गाने रविवार, २४ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजता वाशिम येथे पोहोचले. मोहीम समाप्तीनंतर शर्मा पेट्रोल पंपाजवळ नागरीकांनी या सायकलस्वारांचे जोरदार स्वागत केले. मोहीमेमध्ये चेतन शर्मा, देवानंद भोजे, ऋषिकेश इंगोले, विकी इंगोले, गणेश बोरोकार, शाहरुख गवळी, पवन शर्मा, निरज चारोळे यांनी स्पर्धकांना मार्गात वेळोवेळी मदत पुरविली. मोहीमेमध्ये मार्गात अमरावती सायकल ग्रुप व वरुड ग्रुपच्या वतीने जोरदार स्वागत आणि जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या स्पर्धेत वाशिमचे सनदी लेखापाल मारोती भोयर, लेखाधिकारी युसूफ शेख, यवतमाळचे विजय जाधव, हर्षल झोपाटे, पुसदचे अजय क्षिरसागर, ईशान चव्हाण, आर्णीचे सुनील राणे, सतीश पचखंडे, अभिजीत अंधुरे, नागपुरचे अजय कुलकर्णी, डॉ. स्वाती कुलकर्णी, चांदुबाजारचे हर्षल सावळे, औरंगाबादचे विक्रम घुडे व वर्धा येथुन डॉ. अतुल तायडे यांनी आपला सहभाग नोंदविला. या सायकल मोहीमेच्या यशस्वीतेसाठी वाशीम सायकलस्वार ग्रुपचे चेतन शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले.
नागरीकांनी रोजच्या जिवनात जास्तीत जास्त सायकल वापरावी व त्यायोगे त्यांचे आरोग्य सृद्ढ राहावे यासाठी गेल्या ५ वर्षापासून चेतन शर्मा वाशीम रांदीनियर ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. वाशिम येथून सुरु असणार्‍या या उपक्रमामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने युवक सहभागी होत असून ही सायकल मोहीम सायकलपटुंसाठी तसेच जिल्ह्यासाठी भुषणावह बाब ठरत आहे.

Post a Comment

0 Comments