Ticker

6/recent/ticker-posts

जी एच रायसोनी विद्यापीठात एआय एकीकरणावरील पाच दिवसीय एफडीपीचा यशस्वी समारोप


66 हून अधिक शिक्षक व संशोधकांचा सहभाग; उच्च शिक्षणातील एआयच्या प्रभावी वापरावर भर

अमरावती, प्रतिनिधी / अनिता यादव : उच्च शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि जबाबदार वापर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने जी एच रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय संकुल विकास कार्यक्रमाचा (एफडीपी) उत्साहात समारोप झाला. कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम भारतीय विद्यापीठ संघ (एआययू) आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय विकास केंद्राच्या (एएडीसी) संयुक्त विद्यमाने पार पडला.


"उच्च शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एकीकरण : शैक्षणिक रणनीती, उपकरणे व नैतिक चौकट" या विषयावर आधारित या प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यासह विविध भागांतील ६६ हून अधिक शिक्षक, संशोधक आणि शैक्षणिक प्रशासकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूलभूत संकल्पनांपासून ते अध्यापन, संशोधन आणि मूल्यमापन प्रक्रियेत एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मशीन लर्निंग, एआय-आधारित कंटेंट निर्मिती, वैयक्तिकृत शिक्षण, स्मार्ट मूल्यमापन प्रणाली, संशोधनासाठी एआय साधनांचा वापर आणि शैक्षणिक तंत्रज्ञानातील नव्या घडामोडी यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान रामदेवबाबा विद्यापीठाचे डॉ. निसर्ग गांधेवर, एमडीबी इलेक्ट्रोसॉफ्टचे संस्थापक मंगेश भारती, थ्री पिलर ग्लोबलचे वरिष्ठ विश्लेषक प्रीतम गोहात्रे, पीसीईटी पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे डॉ. प्रणव चरखा, मेटाक्यूब सोल्युशन्सचे सचिन देशमुख तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे डॉ. मोहम्मद अतीक यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

एआयच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर डेटा गोपनीयता, अल्गोरिदमिक पूर्वग्रह, पारदर्शकता, शैक्षणिक प्रामाणिकता आणि बौद्धिक संपदा हक्क यांसारख्या नैतिक बाबींवरही विशेष चर्चा करण्यात आली. सहभागी शिक्षकांना विविध एआय टूल्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी शिक्षकांनी प्रशिक्षणाची उपयुक्तता आणि दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले. एआय साक्षरता वाढविण्यासह आधुनिक आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. जयंत मेहरे आणि डॉ. अजय कुमार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. स्नेहील जायसवाल, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट आणि इंजिनिअरिंग स्कूलचे डीन डॉ. अमित गायकवाड यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments