मानोरा ( सुधाकर चौधरी संपादक ) – आदिवासी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि आरक्षणावर होत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात एक प्रबळ आवाज उठवण्यासाठी “आदिवासी आरक्षण बचाव एल्गार महा मोर्चा” चे आयोजन दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मानोरा येथे करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांतील आदिवासी बांधव, माता-भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या मोर्चाचे प्रमुख सूत्र आहे – “आपला हक्क – आपले आरक्षण! त्याचे रक्षण – आपला संकल्प!”
भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला दिलेले आरक्षण हे त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय विकासाचे अत्यंत महत्त्वाचे अस्त्र आहे. मात्र, सध्या काही गैरसमाजघटक बनावट आदिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे या आरक्षणाचा गैरफायदा घेत असून, त्यामुळे खऱ्या आदिवासी युवकांना नोकरी व शिक्षणातील संधींपासून वंचित राहावे लागत आहे.
हा अन्याय थांबवण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठीच हा एल्गार मोर्चा काढण्यात येत आहे. यामध्ये समाजाच्या सर्व थरांतील प्रतिनिधींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चाचे आयोजक श्री गणेश तुळशीरामजी पाखरे (मो. ९८२२४४३५४९) यांनी सांगितले की, “हा मोर्चा केवळ निदर्शन नव्हे, तर आपल्या पुढच्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. आदिवासी समाज आजही सजग आहे आणि आपल्या हक्कांसाठी एकदिलाने उभा आहे हे शासनाला दाखवून देण्याची ही वेळ आहे.
0 Comments