Ticker

6/recent/ticker-posts

न.प. हद्दीतील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांना मिळणार कायदेशीर मान्यता!


पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा मिळणार लाभ; आमदार श्याम खोडे यांचा पुढाकार


वाशिम ( सुधाकर चौधरी ) – केंद्र व राज्य शासनाच्या "सर्वांसाठी घर" या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत वाशिम – मंगरूळनाथ विधानसभेचे आमदार श्री. श्यामभाऊ खोडे यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. न.प. हद्दीतील शासकीय जमिनीवर ०१ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या निवासी अतिक्रमणधारकांना नियमबद्ध पट्टे वाटप करून कायदेशीर मान्यता देण्याची विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे.

या मागणीला चालना देण्यासाठी आमदार खोडे यांनी महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेऊन यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे अनेक गरीब व बेघर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना तसेच शासनाच्या इतर आवास योजनांचा थेट लाभ मिळू शकणार आहे.

शहरातील वडारपुरा मंगलधाम, संतोषीमाता मंदिर मागील वस्ती, अशोकनगर, भाऊनगर, मठमोहल्ला, वाल्मिकनगर तसेच गावठाण क्षेत्रातील अन्य वस्त्या या यामध्ये समाविष्ट आहेत. या वस्त्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना शासकीय भूखंडावर नियमबद्ध हक्क मिळणार असून, त्यांना आपले स्वतःचे घर बांधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पात्र लाभार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगर परिषद कार्यालय येथे आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन आमदार खोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

"शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना मिळावा, यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील. कोणत्याही लाभार्थ्याला अडचण वाटल्यास त्यांनी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा," असे स्पष्ट मत आमदार खोडे यांनी व्यक्त केले.

या निर्णयामुळे गोरगरिबांना हक्काचं घर मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.


Post a Comment

0 Comments