Ticker

6/recent/ticker-posts

शतकपूर्तीचा दिव्य सोहळा’; श्री चारभुजानाथ मंदिरात ब्रह्मोत्सव भक्तिभावात संपन्न



श्री चारभुजानाथ मंदिराच्या शताब्दी ब्रह्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा.


        मंगरूळ नाथ सुधाकर चौधरी — श्री चारभुजानाथ मंदिराच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य ब्रह्मोत्सव भक्ती, संस्कृती आणि ग्रामएकतेच्या उत्साहात संपन्न झाला. श्री चारभुजा नाथ मंदिर सत्संग मंडळ व राजस्थानी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या महोत्सवाला गावासह परिसरातील भाविक, ग्रामस्थ व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


गेल्या शंभर वर्षांपासून गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक जीवनात केंद्रस्थानी राहिलेल्या श्री चारभुजानाथ मंदिराच्या शताब्दी वर्षानिमित्त हा ब्रह्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. मंदिर हे ग्रामस्थांच्या श्रद्धेचे अधिष्ठान असून, प्रत्येक शुभकार्य, सुख-दुःखाच्या प्रसंगी गावकऱ्यांचा भावनिक आधार राहिले आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आकर्षक सजवलेल्या रथासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जयघोष, फुलांची उधळण आणि भक्तिमय वातावरणात संपूर्ण गाव दुमदुमले. त्यानंतर धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी राजस्थानी भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरण भारावून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी महाअभिषेक, हवन व वैदिक मंत्रोच्चारात विधिवत पूजन करण्यात आले. नाशिक येथील विशेष आचार्य मुकुंदाचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे पुजारी सुरजमलजी तिवारी यांनी विधी पार पाडले. सायंकाळी राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने आयोजित भजनांची अंताक्षरी विशेष आकर्षण ठरली. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत भक्तिरंग उधळला.

तिसऱ्या दिवशी कल्याण उत्सव व देवविवाह सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. संध्याकाळी आयोजित अभिनव नृत्य स्पर्धेत लहान–मोठ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाची सांगता पारंपरिक पद्धतीने महाप्रसादाने करण्यात आली.

या ब्रह्मोत्सवासाठी प्रमुख यजमान म्हणून शामसुंदर भूतडा यांनी जबाबदारी सांभाळली, तर दैनिक यजमान म्हणून प्रभादेवी बजाज, प्रवीण बाहेती व संतोष बियाणी यांनी सहभाग घेतला. आयोजन यशस्वी करण्यासाठी राजूभाऊ बजाज, नथमल पुरोहित, नारायणीबाई मुंदडा, लता बजाज, तसेच राजस्थानी युवक मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, श्री चारभुजानाथ विश्वस्त मंडळ आणि इतर सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

उत्सवाला लाभलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र बजाज व राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमा बाहेती यांनी सर्व ग्रामस्थ, भाविक, सहकार्य करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

शताब्दी ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने गावातील श्रद्धा, एकोपा व सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी दर्शन घडले असून, हा दिव्य सोहळा भाविकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments