मंगरूळपीर/सुधाकर चौधरी
: श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात कृष्ण जन्म सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. श्री संत गजानन महाराज संस्थान ट्रस्ट, हुडको मंगलधाम कॉलनी, मंगरूळनाथ (जि. वाशिम) यांच्या वतीने आयोजित या सप्ताहात भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
भागवताचार्य ह.भ.प. राघोजी महाराज अवगण (रा. पिंप्री, ता. मंगरूळनाथ) यांनी आपल्या प्रभावी वाणीने श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग रसाळ शैलीत उलगडला. कंसाच्या कारागृहात मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा अवतार कसा झाला, देवकी-वसुदेव यांची भक्ती, दैवी चमत्कार आणि नंदगावातील आनंदमयी वातावरण याचे जिवंत वर्णन करत त्यांनी उपस्थित भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले.
यावेळी कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, “जय श्रीकृष्ण”च्या घोषात आणि फुलांच्या वर्षावात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. पालखी सोहळा, आरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रवचनात भागवताचार्यांनी सांगितले की, श्रीकृष्ण जन्म म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि अंध:कारावर प्रकाशाचा विजय होय. मानवाच्या जीवनातील संकटे, भीती आणि मोह यांवर मात करण्यासाठी श्रद्धा, भक्ती आणि सदाचार आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला. श्रीकृष्णाचा जन्म प्रत्येकाच्या अंतःकरणात सद्गुणांचा उदय होण्यासाठी प्रेरणा देतो, असेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यास महिला भजनी मंडळे, स्थानिक भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. श्री संत गजानन महाराज व्यवस्थापन समितीच्या वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले.
सदर भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहात दररोज भागवत कथा सुरू असून विविध भजनी मंडळांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
|| गण गण गणात बोते ||
भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक व देखणी रांगोळी काढण्यात आली होती. श्रीकृष्ण जन्म सोहळ्याचे प्रतीक दर्शवणारी बाळकृष्ण, शंख-चक्र-गदा-पद्म तसेच फुलांच्या नक्षीदार आकृत्यांनी सजलेली ही रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. रंगांच्या सुंदर संगमातून भक्तीभाव आणि आनंदाचे वातावरण अधिक खुलून दिसत होते. महिला मंडळाच्या सदस्यांनी अत्यंत मेहनतीने साकारलेली ही रांगोळी कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
कृष्ण जन्म सोहळ्यानिमित्त टाळ-मृदुंगाच्या गजरात व फुलांच्या वर्षावात साजरा होत असलेला बाळकृष्ण जन्मोत्सव; उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन.
0 Comments