Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत गजानन महाराज प्रगटदिन व भागवत ज्ञानयज्ञ सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; भव्य महाप्रसादाने शेकडो भाविक तृप्त


मंगरूळपीर (जि. वाशिम) – श्री संत गजानन महाराज संस्थान, हुडको कॉलनी, मंगरूळपीर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रगटदिन व भागवत ज्ञानयज्ञ सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण परिसर “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.


“जीवा-शिवाची सांगड घालत माणूसपणाचा संदेश; श्रीराम महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध”

काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. श्रीराम महाराज चौधरी यांनी अत्यंत ओजस्वी व विचारप्रवर्तक शब्दांत काल्याच्या कीर्तनाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. ‘जीवा-शिवाची सांगड’ घालत भक्ती हीच आत्मोद्धाराची खरी वाट असल्याचे त्यांनी प्रभावी उदाहरणांतून पटवून दिले. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या युगात “माणूस होणे हीच काळाची खरी गरज आहे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला. धन-दांडग्यांनी व श्रीमंतांनी केवळ वैभवासाठी नव्हे, तर समाजहित व भक्तीमार्गासाठी आपले धन खर्च करावे, समाजसेवा व धर्मकार्याला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. विविध दृष्टांत, कथा आणि अभंगांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित भाविकांना आत्मपरीक्षणाची प्रेरणा देत संपूर्ण कीर्तन भक्तिरसात रंगविले.

या सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याचे कीर्तन ह.भ.प. श्रीराम महाराज चौधरी (रा. चिंचखेडा, ता. मंगरूळनाथ, जि. वाशिम) यांच्या रसाळ वाणीने रंगले. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. 


तसेच भागवत ज्ञानयज्ञाचे मार्गदर्शन भागवताचार्य ह.भ.प. राघोजी महाराज अवगण (रा. पिंप्री, ता. मंगरूळनाय, जि. वाशिम) यांनी केले. त्यांच्या ओजस्वी भागवत कथेन  उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.


संगीतमय भागवत सोहळ्यात विणेकरी आनंद महाराज चौगुले यांनी वीणेच्या मधुर सुरांनी कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या सुरेल साथीस विशेष आध्यात्मिक गायनाचार्य नैनेश अवगन महाराज (पिंपरी), ललिता ताई शिंगणे (मंगरूळनाथ), दाते महाराज, बोडखे महाराज, देशमुख महाराज आणि भुरके महाराज यांनी भावपूर्ण व सुरेल संगती दिली. ताल, स्वर आणि भक्तिरस यांचा सुंदर संगम साधत त्यांनी भागवताचे सादरीकरण अत्यंत प्रभावी व मनोवेधक पद्धतीने साकारले, ज्यामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

दि. ०८ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी भागवत सांगता व श्री गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवानिमित्त श्रींची महापूजा व अभिषेक सकाळी ६ वाजता श्री हरिष जुगलकिशोरजी बियाणीसौ. प्रेरणा हरिष बियाणी यांच्या हस्ते विधिवत पार पडला. यावेळी वातावरण भक्तिभावाने भारावून गेले होते.

भागवत ग्रंथ पूजनाचा मान श्री चंदुभाऊ परळीकरसौ. मिराताई परळीकर यांना लाभला. वेदघोष, मंत्रोच्चार आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पार पडलेल्या या विधींनी सोहळ्याला अधिकच आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.


भागवत पूजनाचा सोहळा प्राध्यापक विजय शेळकेसौ. विजया शेळके यांच्या हस्ते अत्यंत विधीवत आणि भक्तिभावाने पार पडला. मंत्रोच्चार, वेदघोष आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या पूजनामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. श्रद्धा, शिस्त आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम या पूजन सोहळ्यात अनुभवायला मिळाला. उपस्थित भाविकांनीही या पूजनाच्या क्षणांचे साक्षीदार होत भागवत महात्म्याचा लाभ घेतला. शेळके दांपत्याने नम्रतेने आणि समर्पण भावनेने पार पाडला


श्री संत गजानन महाराज प्रगटदिन व भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त मंगरूळपीर येथील संस्थान परिसरात महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज व्यवस्थापन समिती व गजानन महाराज महिला मंडळ, हुडको कॉलनी, मंगरूळनाथ यांच्या वतीने करण्यात आले होते. भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

प्रगटदिन व भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. श्रद्धा, सेवा आणि सामूहिक भक्तीभावाचा संगम घडवणारा हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.




Post a Comment

0 Comments