Ticker

6/recent/ticker-posts

जीवा-शिवाची सांगड घालत माणूसपणाचा जागर; श्रीराम महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध


मंगरूळपीर : श्री संत गजानन महाराज संस्थान, हुडको कॉलनी, मंगरूळपीर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रगटदिन व भागवत ज्ञानयज्ञ सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हरिनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भक्तांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपूर्ण परिसर अध्यात्मिक उर्जेने भारावून गेला.


या सोहळ्यातील काल्याचे कीर्तन हे प्रमुख आकर्षण ठरले. ह.भ.प. श्रीराम महाराज चौधरी यांनी आपल्या ओजस्वी, प्रभावी आणि विचारप्रवर्तक निरूपणातून ‘जीवा-शिवाची सांगड’ घालत आत्मा-परमात्म्याच्या मिलापाचे गूढ तत्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत उलगडले. “भक्ती ही केवळ कर्मकांड नसून ती जीवनातील आचरणातून प्रकट होणारी अनुभूती आहे,” असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी आत्मपरीक्षणाची दिशा दिली.

आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि स्वार्थी प्रवृत्ती वाढलेल्या युगात माणूसकी जपणे हीच खरी साधना आहे, असे सांगताना त्यांनी “माणूस होणे हीच काळाची खरी गरज आहे,” हा संदेश ठसवला. पैसा, प्रतिष्ठा आणि वैभव यांच्या मागे धावताना समाजहिताची जाणीव हरवू नये, असे सांगत धर्मकार्य, शिक्षण, गोसेवा आणि समाजसेवा यासाठी संपन्न घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कीर्तनादरम्यान संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचा संदर्भ देत “भक्ती म्हणजे पूजा नव्हे, तर शुद्ध आचरण,” हे अधोरेखित करण्यात आले. आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबसंस्थेच्या भक्कम पायावरच सुदृढ समाज उभा राहतो, असे स्पष्ट केले. गोसेवेचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद करत ग्रामीण संस्कृतीतील मूल्यांचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

व्यसनाधीनतेवर परखड प्रहार करताना “व्यसन हे जीवन उद्ध्वस्त करणारे दलदल आहे,” असा इशारा देत तरुणाईने संस्कार, साधना आणि समाजकार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे त्यांनी सांगितले. एका दृष्टांताच्या माध्यमातून चुकीच्या सवयींमुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते आणि भक्तीमार्गाने परतल्यावर जीवनात कसा सकारात्मक बदल घडतो, हे प्रभावीपणे मांडले.


संगीतमय काल्याच्या कीर्तनात मृदंगाचार्य माधव महाराज (चिंचखेडा) यांनी दमदार तालसाथ देत कीर्तनाला जोशपूर्ण लय दिली. विणेकरी आनंद महाराज चौगुले यांच्या वीणेच्या मधुर सुरांनी कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. तसेच गायनाचार्य गणेश सोनटक्के (चिंचखेडा), लक्ष्मण महाराज (वरुड), नैनेश अवघन महाराज (पिंपरी), ललिता ताई शिंगणे (मंगरूळनाथ), दाते महाराज, बोडखे महाराज, देशमुख महाराज आणि भुरके महाराज यांनी सुरेल संगती देत कीर्तन अधिक रंगतदार व भावपूर्ण केले. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर आणि हरिनामाच्या गजरात उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन झाले.


कीर्तनाच्या समारोपावेळी ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. आत्मपरीक्षण, समाजसेवा, मायबापांची सेवा, गोसंवर्धन आणि व्यसनमुक्तीचा ठोस संदेश देणारे हे काल्याचे कीर्तन भाविकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. धार्मिकतेसोबत सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारा हा सोहळा मंगरूळपीरच्या आध्यात्मिक परंपरेला साजेसा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment

0 Comments