Ticker

6/recent/ticker-posts

"पंचायत समितीच्या नवीन प्रवेशद्वारावर बाळासाहेबांचे नाव लावा; शिवसेनेचा एल्गार"


"बाळासाहेबांचे नाव कायम ठेवा; अन्यथा रस्त्यावर उतरू!" – पंचायत समितीच्या नवीन प्रवेशद्वारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा इशारा

मंगरूळपीर | सुधाकर चौधरी

मंगरूळपीर पंचायत समितीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराला हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. ही मागणी तातडीने मान्य न झाल्यास पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.

यासंदर्भात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या शिष्टमंडळाने मंगरूळपीर येथील गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. त्यामुळे नव्याने उभारलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारालाही तेच नाव कायम ठेवणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे.

पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे नेते नव्हते, तर लाखो शिवसैनिकांच्या अस्मितेचे आणि जनभावनेचे प्रतीक होते. त्यांच्या समाजकारण, जनहित आणि मराठी अस्मितेसाठीच्या योगदानाचा सन्मान कायम राखण्यासाठी नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारालाही त्यांचेच नाव देणे आवश्यक आहे.

प्रशासनाने जनभावनेचा आदर करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाप्रमुख सचिन परळीकर, विधानसभा संघटक बंडूभाऊ वैद्य, तालुका प्रमुख अर्जुन भीमराव सुर्वे, शहर प्रमुख निखिल इंगोले, तालुका समन्वयक भागवत शिंदे, तालुका संघटक शिवा सावके, तसेच ज्ञानू भडांगे, गौरव बोरकर, महेंद्र ठाकरे, वैभव भुजाडे, नितेश खडसे, युवराज सुर्वे, अमोल ठाकरे, बाळकृष्ण रोकडे, वृषिकेश जाधव, नाना महाकाळ, गजानन सुर्वे, ओम इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, या मागणीकडे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता तालुक्यातील नागरिकांसह शिवसैनिकांचे लक्ष लागले असून, या प्रश्नावर पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Post a Comment

0 Comments