Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच मंदिरात चोरी!आमदार साहेबांच्या परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; मग सामान्य जनतेचे काय?

मंगरूळपीरमध्ये खळबळ! पोलीस ठाण्याच्या नाकावर टिचून शनी मंदिर लुटले; खाकी वर्दीतील धाक हरवला का?

मंगरूळपीर | वाशिम खबर आवाज महाराष्ट्र

मंगरूळपीर शहरात चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील पोलीस ठाण्याच्या अगदी पाठीमागे, आमदार साहेबांच्या परिसरात असलेल्या वीर भगतसिंग व्यायामशाळेजवळील शनी मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली. पोलीस ठाण्याच्या इतक्या जवळ, आमदार साहेबांच्या परिसरातच चोरट्याने हातसफाई करावी, ही बाब शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

साहेब, पोलीस स्टेशनच्या पाठीमागे चोरी झाली… मग जनसामान्यांचे काय?

२५ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शनी मंदिरात प्रवेश करून तांब्याचे दिवे, पितळी नाग, तांब्याची कळशी आणि धार्मिक साहित्य चोरी करून नेल्याची माहिती आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही समजते.

पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच चोरी होत असेल, तर शहरातील दूरच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? आमदार साहेबांच्या परिसरातच चोरट्यांचे धाडस एवढे वाढले असेल, तर मंगरूळपीर शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नेमकी काय आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शहरातील चोरीच्या घटनांचा छडा कधी लागणार?

मंगरूळपीर शहरात यापूर्वीही चोरीच्या अनेक घटना घडल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप उलगडा झालेला नाही. चोरटे मोकाट आणि नागरिक भयभीत, अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

चोरीच्या घटना घडतात, तक्रारी दाखल होतात, तपास सुरू असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार? चोरीस गेलेली मालमत्ता नागरिकांना कधी परत मिळणार? या प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत.

खाकी वर्दीतील धाक हरवला का?

खाकी वर्दीचा धाक हा केवळ गणवेशात नसतो, तर गुन्हेगारांवर होणाऱ्या प्रभावी कारवाईत असतो. पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच मंदिरात चोरी होणे आणि शहरातील चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये असमाधान व्यक्त होणे, ही बाब पोलिसांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ असल्याचे दर्शवते.

मंदिर सेवेकरी अजय दामोदर पाटील यांनी २६ नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. पोलीस निरीक्षक किशोर शोलके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

आता केवळ चौकशी नको, ठोस परिणाम हवा!

सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याची ओळख पटवावी, चोरीस गेलेले धार्मिक साहित्य हस्तगत करावे आणि शहरातील प्रलंबित चोरीच्या घटनांचा तपास वेगाने पूर्ण करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

मंगरूळपीर पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेत तातडीने कारवाई करावी. अन्यथा शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षा व्यवस्थेबाबत निर्माण झालेला अविश्वास अधिक वाढण्याची शक्यता आहे.

जनतेचा थेट सवाल!

पोलीस ठाण्याच्या पाठीमागे मंदिर सुरक्षित नाही… आमदार साहेबांच्या परिसरात चोरी होते… मग सामान्य जनतेच्या घरादाराची सुरक्षा कोण करणार?

खाकीचा धाक गुन्हेगारांवर दिसला पाहिजे; सामान्य नागरिकांवर नव्हे!

— सुधाकर चौधरी
संपादक
वाशिम खबर आवाज महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments