वाशिम,
११ डिसेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश संजय शिंदे यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे,कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबद्दलची आपसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे वगळून इतर प्रकरणे,आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद,भू-संपादन प्रकरणे तसेच मनाई हुकुमाचे दावे,विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद आदी दिवाणी प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत.


0 Comments