वाशिम दि ३ :- कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील महात्मा गांधी प्राथमिक आश्रम शाळेत कार्यरत असलेले दिव्यांग शिक्षक विजयकुमार मोटघरे यांना तब्बल १८ महिन्यापासून वेतनापासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांनी प्रशासनाच्या मुर्दाडपणाला कंटाळून कुटुंबियांसह ५ जानेवारी पासून अमरावती येथे बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
यासाठी ते आज (दि३) कारंजा येथून अमरावतीकडे पायदळ प्रवासाला निघाले. तथापि उपाशीपोटी तब्बल १२ किलोमीटर पायदळ चालल्यानंतर त्यांच्या आधीच आजारी असलेल्या पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कारंजा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस व समाज कल्याण कार्यालयाचे कर्मचारी मोटघरे यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ठोस कार्यवाही पर्यंत मोटघरे कुटूंब आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
विजयकुमार रामहरी मोटघरे हे यापुर्वी कळंबा बु. येथील लोहसिंग प्राथमिक आश्रम शाळेत शिक्षकपदी कार्यरत होते. त्यानंतर १८ महिन्यापुर्वी त्यांची बदली लोहगाव येथील महात्मा गांधी प्राथमिक आश्रम शाळेत करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नाव समाज सेवार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे १८ महिन्यापासून ते वेतनापासून वंचित आहेत. उपाशीपोटी ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. विजयकुमार मोटघरे हे स्वत: अपंग आहेत. दरम्यान त्यांच्या पत्नीची मोठी शल्यचिकित्सा झाली आहे. मुलांचे शिक्षणावर मोठा खर्च करावा लागतो आहे. तथापि वेतन नसल्यामुळे प्रचंड आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आहे. आपल्या वेतनासाठी त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार करुनही केवळ आपले नाव समाज सेवार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करण्यासाठी वरीष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला असून तो प्रलंबित आहे, अश्या कोरड्या उत्तराशिवाय मोटघरे यांच्या पदरी काहीही पडले नाही. त्यामुळे लालफितशाहीच्या दप्तर दिरंगाईला कंटाळून विजय मोटघरे यांनी अमरावती येथील समाज कल्याण सह आयुक्त कार्यालयासमोर ५ जानेवारी पासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. आपली जमापुंजी संपल्याने विजय मोटघरे आज कारंजा तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या आजारी पत्नीसह पायीच अमरावती कडे रवाना झाले.
आजारी पत्नीची प्रकृती बिघडली
वेतनाअभावी व आजारी पत्नीच्या शल्यचिकित्सकेसाठी जवळची जमापुंजी संपल्यामुळे अमरावती येथे उपोषणाला जाण्यासाठी बस भाड्याएवढे पैसे सुध्दा जवळ नसल्याने मोटघरे कुटुंब आज कारंजा येथून अमरावती येथे जाण्यासाठी पायदळ निघाले. तथापि उपाशीपोटी १२ किलोमीटरहून अधिक अंतर कापल्यानंतर काही महिन्यांपूर्वी मोठी शल्य चिकित्सा झालेल्या त्यांच्या पत्नीला चक्कर येऊन त्या जागीच कोसळल्या. मात्र मोटघरे यांच्या सोबत असलेल्या मित्रमंडळी व पोलीसांनी या दाम्पत्याला कारंजा येथे परत आणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या उपासी दिव्यांग शिक्षकाची उपोषणाची भूमिका पाहून भंबेरी उडालेले समाज कल्याण कार्यालयातील काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहेपर्यंत पोलीस व अधिकारी हे मोटघरे कुटूंबियांना उपोषणा पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि वेतन आपल्या खात्यात जमा होण्याच्या संदर्भात ठोस कार्यवाही व याप्रकरणी दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वर कारवाई होत नाही तोपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याची भूमिका मोटघरे कुटुंबाने घेतली आहे.
अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करा- संघटनांची मागणी
विजय मोटघरे यांच्या उपोषणाला जिल्ह्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. वास्तविक वेतनापासून वंचित ठेवणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून याप्रकरणी वेळकाढूपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी तसेच मोटघरे यांना तात्काळ वेतन द्यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, प्रहार आश्रमशाळा संघटना, शिक्षकेतर संघटना आदी संघटनांनी केली आहे.
0 Comments