वाशिम - लाड पागे समिती ही वाल्मीकी मेहतर समाजातील समाजातील सफाई कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी गठीत करण्यात आली असून या समितीतील शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस संघटना न्यायमार्गाने आंदोलन करीत आहे. अशातच राज्याचे सामाजीक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी लाड पागे समितीच्या शिफारसी इतर कामगारांसाठी लागु केल्याचा निर्णय दिल्यामुळे राज्यातील वाल्मीक मेहतर सफाई कामगार संतप्त झाले आहेत. सदरचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी २ मार्च रोजी संघटनेच्या झेंड्याखाली व जिल्हाध्यक्ष नंदु पवार यांच्या नेतृत्वात जिल्हधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलन करुन जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्रात अस्वच्छ काम करणारा मेहतर, वाल्मीकी समाजाने मलमुत्र डोक्यावर वाहून समाजाच्या आरोग्याचे रक्षण केले आहे. हे काम इतर समाज करीत नसल्यामुळे लाड पागे समितीच्या परिघामध्ये त्यांना आणण्याचा प्रश्नच नाही. त्यातील काही लोक सफाई कामगार म्हणून शासकीय नोकरीत लागले व आज ते शिपाई व लिपीक आहेत. लाड पागे समितीची मुळ संकल्पना मेहतर वाल्मीकी समाजाच्या रोजगार तसेच पुनर्वसनासाठी असून
ही मुळ शिफारस शासनाच्या दोन्ही सभागृहात स्विकृतीनंतर कायद्याच्या स्वरुपात १९६७५ मध्ये लाड कमेटी व १९७९ मध्ये पागे कमेटीच्या सर्व शिफारसी मंजुर करुन शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. या शिफारसीच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस संघटनेने १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी मुंबई येथे काढलेल्या विशाल जनआक्रोश रॅलीनंतर शासनाने यासंदर्भात सुधारीत शासन निणर्य निर्गमित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सदर समितीची फाईल सामाजीक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या विभागात प्रलंबित पडलेली होती. यावर ना. मुंडे यांनी निर्णय देतांना लाड पागे समितीच्या शिफारसी सर्व कामगारांसाठी असल्याचा अहवाल दिल्यामुळे राज्यातील सफाई कामगार संतप्त झाले असून ना. मुंडे हे जातीय व्देषभावनेने मेहतर वाल्मीकी समाजावर अन्याय करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लाड पागे समितीच्या मुळ शिफारसीप्रमाणे शासकीय आदेशात फेरबदल करण्यात येवू नये तसेच अन्य समाजासाठी ही मेहतर समाजाच्या हक्काची योजना लागु करण्यात येवू नये. अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नंदु पवार, राजु मलीक, भगत धामणे, समाजसेवक राजाभैय्या पवार, अमर समुद्रे, नितीन दावके, राहुल मलीक, शिवा गिरे, दारा कनोजे, धिरज बढेल, शेखर नकवाल, रमेश श्रृंगारे, अजय नकवाल, भय्याजी नकवाल, नरसिंग चरावंडे, लक्ष्मण खोडे, रमेश खोडे, कमलेश कोळी, गोपाल गोहर, विजय घारु, रमेश ढेणवाल, भारत सारवान, शाम घारु यांच्यासह वाल्मीकी मेहतर समाजातील सफाई कामगार सहभागी झाले होते.
0 Comments