वाशिम - एन.ए., बांधकाम परवाना व इतर सर्व प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्याच्या जिल्हा ठिकाणी असलेल्या नगररचना विभागातील ऑनलाईन यंत्रणा गेल्या अनेक दिवसापासून बंद होती. ही बाब लक्षात घेवून जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांनी गुरुवार, १५ सप्टेंबर रोजी अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी श्री गगराणी यांनी सोमवारपर्यत सर्व जिल्हयातील नगर रचना विभागातील ऑनलाईन यंत्रणा सुरु होईल असे आश्वासन दिल्यामुळे धाडवे यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागला आहे.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील नगररचना विभागात शहरी तसेच ग्रामीण भागातील बांधकाम परवाने, एन. ए. व इतर परवान्यासाठी नागरीकांना ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले होते. शासनाने यासंबंधी शासननिर्णय सुध्दा काढला होता. तसेच ऑनलाईन यंत्रणा उभारण्यासाठी महाआयटी कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र शासन निर्णय निघून दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटूनही अद्याप ही यंत्रणा उभारण्यात न आल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांना ऑनलाईन प्रस्ताव दाखल करता येत नव्हते. जुलै २०२२ पासून सर्व प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे बांधकामासाठी ज्या व्यक्तींनी बँकेतून कर्ज घेतले होते त्यांना व्याजाचा नाहक भूर्दंड सहन करावा लागत होता. तसेच नगरचना विभागात ऑनलाईन यंत्रणा बंद असल्यामुळे शासनालाही विकास शुल्क, उपकर तसेच तर महसुल येणे बंद झाले होते. जनतेला याचा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत होता व प्रकरणे निकाली निघत नसल्यामुळे शासनाच्या विरोधात जनतेचा रोष पसरला होता. ही बाब लक्षात घेवून जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांनी नगरचना विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांची भेट घेवून त्यांना ही परिस्थिती सांगीतली व लवकरात लवकर नगरचना विभागातील ऑनलाईन यंत्रणा सुरु करुन नागरीकांना दिलासा देण्याची विनंती केली. यावर येत्या सोमवारपर्यत राज्याच्या सर्व जिल्हयातील नगर रचना विभागातील ऑनलाईन यंत्रणा सुरु होईल असे आश्वासन दिले. तसेच श्री गगराणी यांनी नगर विकास विभागाचे अवर सचिव श्री गोखले यांना याबाबत त्वरीत कार्यवाही सुरु करण्याचे आदेश देवून ही ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नगररचना कार्यालयात तज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्यात येईल असेही आश्वासन दिले. त्यामुळे लॉ. धाडवे यांच्या प्रयत्नामुळे ऑनलाईन प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लागून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या नगर रचना विभागातील कामांना वेग येवून नागरीकांना दिलासा मिळाला आहे व शासनाच्या महसुलातही भर पडली आहे.
0 Comments