शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनाही व्हीप बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. मात्र, या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटात एक असा एकमेव आमदार आहे ज्याला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार नाही.
अंधेरी विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक होणार होती. याच दरम्यान हे राजकीय नाट्य घडले होते. भाजपने या निवडणुकीत मुरजी पटेल यांना तर उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ऋतुजा लटके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना या पक्षाच्या नावावर आणि मशाल या चिन्हावर ही निवडणूक लढविली. ऋतुजा लटके या निवडणुकीत जिंकून आल्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार ऋतुजा लटके यांचा पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना हा आहे. तर, त्यांचे निवडणूक चिन्ह मशाल आहे.त्यामुळे सध्या तरी त्या उद्धव ठाकरे गटाच्या असा एकमेव आमदार आहेत की शिंदे गटाचा व्हिपच काय कोणताही आदेश त्यांना लागू होत नाही अशी माहिती विधान भवनातील सूत्रांनी दिली
0 Comments