Ticker

6/recent/ticker-posts

सवाशिम मंगरुळपीर विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील निष्ठावंतांचाच विचार व्हावा

वाशिम मंगरुळपीर विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील निष्ठावंतांचाच विचार व्हावा
उपर्‍यांना स्थान नको : बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वज्रमुठ
वाशिम - आगामी होणार्‍या वाशिम मंगरुळपीर विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीकडून गेल्या अनेक वर्षापासून पक्षात इमानेइतबारे काम करणार्‍या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी. या निवडणूकीत बाहेरुन पक्षात प्रवेश घेणार्‍यांना उमेदवारी देवू नये असा ठाम निर्णय महाविकास आघाडीच्या वतीने गुुरुवार, ५ सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार, काँग्रेस व शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशिम मंगरुळपीर मतदारसंघ हा राखीव आहे. येत्या काही दिवसात वाशिम मंगरुळपीर मतदारसंघात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यादृष्टीने महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तसेच या निवडणूकीमध्ये केवळ उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण महाविकास आघाडीत प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. मात्र पक्षात गेल्या दोन दशकापासून जिवाचे रान करुन तळमळीने काम करणार्‍या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तसेच जनतेकडूनही या बाबीला दुजोरा मिळत आहे. या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीेत येत्या निवडणूकीमध्ये उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या काही वर्षाआधी शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडून अनेकांनी महायुतीसोबत हातमिळवणी करुन सत्ता काबीज केली. मात्र शिवसेनेतील कट्टर आणि निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहीले. त्यामुळे या निष्ठावंतांच्या कार्याची पक्षश्रेष्ठींनी कदर करुन त्यांनाच उमेदवारी द्यावी. नव्याने पक्षात येणार्‍या उपर्‍यांना उमेदवारी दिल्यास पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरु शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी या बाबीचा विचार करुन पक्षासाठी आपले सर्वस्व अर्पण करणार्‍या पक्षातील निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी याबाबत सदर बैठकीत कार्यकर्त्यांनी ठाम निर्णय घेतला आहे. तसेच उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसकडून छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. उमेदवारीबाबत काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी छाननी समितीला सल्ला दिला आहे की, बाहेरचा कितीही मोठा नेता असला तरीही त्यांना पक्षाच्या वतीने त्याला शिफारशीच्या आधारे उमेदवारी देण्यात येवू नये. तसेच कोणत्याही मोठ्या नेत्याचे नाव घेतले तरीही त्याला उमेदवारी देवू नये असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यासोबत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुध्दा बाहेरुन पक्षात येणार्‍या उमेदवारांना तिकीट दिल्या जाणार नसल्याचे ठामपणे सांगीतले. तसेच या मागणीच्या पुर्ततेसाठी लवकरच महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीला इच्छुक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार असल्याचे सदर बैठकीत घोषित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments