Ticker

6/recent/ticker-posts

जर हेच आयुष्य आहे, तर मग मरण म्हणजे काय आहे मित्रांनो…?


वाशिम :
शुक्रवार, ३० मे २०२५ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता वाशिम शहरातल आनंद रेस्टॉरंटसमोर, बस स्थानकाच्या समोर एक हृदयद्रावक घटना घडली, जी आजच्या समाजाच्या संवेदनशून्यतेकडे बोट दाखवते.

सुमारे ९० वर्षांची एक वृद्ध महिला, अत्यंत दीनवस्थेत, गुडघ्यांवर चालत रस्ता पार करत होती. तिच्या अंगावर फाटकी कपडे, एका हातात लाकडी काठी, दुसऱ्या हातात पाण्याची बाटली आणि काही नाण्यांव्यतिरिक्त काहीच शिल्लक नव्हतं. शरीर इतकं अशक्त झालं होतं की चालताना ती थेट रस्त्याच्या मधोमध कोसळली. अनेकजण तिच्या शेजारून गेले, काहीजण थांबून पाहूनही गेले — पण मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.

या साऱ्या प्रसंगाचे साक्षीदार ठरले पत्रकार संदीप ओ. पिंपलकर. त्यांनी प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेत वाहन थांबवलं आणि त्या महिलेला मदत करण्यासाठी पुढे आले. त्यांनी तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलिसांनी सहकार्य दाखवत १०८ क्रमांकावर कॉल करण्याचा सल्ला दिला. संदीप यांनी लगेचच १०८ वर संपर्क साधत मदतीची विनंती केली.

तोपर्यंत समाजसेवक राजकुमार पडघान यांनी सदर वृद्धेला उचलून रस्त्याच्या कडेला सुरक्षित बसवलं. थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स आली आणि संदीप, ॲम्ब्युलन्स कर्मचारी व अन्य समाजसेवक अनंत तायडे यांच्या मदतीने त्या वृद्धेला रुग्णवाहिकेत हलवण्यात आलं. काही अनोळखी नागरिकांनीही या कार्यात मोलाची साथ दिली.

या घटनेनंतर संदीप पिंपलकर यांनी व्यक्त केलेल्या भावना मनाला चटका लावणाऱ्या होत्या. “माझा त्या वृद्धेशी काहीही संबंध नव्हता, पण माणुसकीचं नातं सर्वात महत्त्वाचं असतं. आपण कितीही व्यस्त असलो, एखाद्या गरजूच्या मदतीसाठी थांबायला हवं,” असं त्यांनी म्हटलं.

आज समाजात कुणाकडे संपत्तीचा ढीग आहे, पण माणुसकी हरवत चालली आहे. दुसरीकडे, अशा असंख्य वृद्ध, निराधार व्यक्ती उपासमारीमुळे आणि उपेक्षेमुळे मृत्यूच्या दारात पोहोचत आहेत. त्यांचं कोण आहे? त्यांच्या सुखदुःखाला कोण पाठीशी आहे? समाज, सरकार, किंवा आपण — या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची वेळ आता आली आहे.

या प्रसंगातून मिळालेला संदेश स्पष्ट आहे –
जर हीच आयुष्य आहे, तर मग मरण म्हणजे काय आहे मित्रांनो…?
जर हाच स्वर्ग आहे, तर मग नरक म्हणजे काय आहे मित्रांनो…?

— संदीप ओ. पिंपलकर
(पत्रकार, वाशिम)
मो. ९८२२०४७०६८


Post a Comment

0 Comments