कारंजा तालुक्यात सर्वाधिक २.०७ मीटरची घसरण; मंगरूळपीर तालुक्यातही भूजल पातळी खालावली
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्याने भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्यातील भूजल पातळीत मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल १.११ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये पाणीपातळी खालावल्याने आगामी रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील ७९ निरीक्षण विहिरींच्या नोंदींच्या आधारे ही स्थिती समोर आली आहे. मागील पाच वर्षांतील ऑक्टोबर महिन्याची सरासरी भूजल पातळी ०.९७ मीटर होती. मात्र, यंदा सप्टेंबरअखेर ती २.०८ मीटरपर्यंत खोल गेली आहे. त्यामुळे शेतीच्या सिंचनासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
कारंजा तालुक्यात सर्वाधिक घसरण
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, कारंजा तालुक्यात सर्वाधिक २.०७ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. त्यापाठोपाठ मंगरूळपीर तालुक्यात १.३६ मीटर, मानोरा तालुक्यात १.१५ मीटर, मालेगाव तालुक्यात ०.८१ मीटर, रिसोड तालुक्यात ०.७० मीटर, तर वाशिम तालुक्यात ०.५८ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.
शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे आव्हान
भूजल पातळीतील घसरणीमुळे रब्बी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.
जलपुनर्भरण आणि पाणी बचतीची गरज
पाण्याचा अपव्यय टाळणे, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर वाढवणे, तसेच जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. प्रशासनाने पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासोबतच पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागांत ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक वैभव श्रीरामे यांनीही कमी पावसामुळे भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याचे सांगितले असून, आगामी काळात जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
कमी पाऊस, खालावलेली भूजल पातळी आणि आगामी उन्हाळा या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
0 Comments