Ticker

6/recent/ticker-posts

पालावर शिक्षणाचा उजेड : पोलीस कर्मचारी संगिता ढोले यांचं माणुसकीचं विद्यादान



वाशिम – नोकरी ही त्यांची ओळख, पण सेवा ही त्यांची खरी भावना! वर्दीतून जबाबदारी निभावताना पोलीस कर्मचारी संगिता ढोले या दररोज एक वेगळी ड्युटी करतायत – ती म्हणजे माणूस घडवण्याची. रेल्वे स्थानकाजवळील पालावर राहणाऱ्या गरीब, वंचित मुलांना त्या गेली कित्येक वर्षं शिकवतायत – विनामोबदला, निस्वार्थ!


"कसली अपेक्षा नाही, कसली जाहिरात नाही – फक्त शिक्षणाचा दीप हातात घेऊन त्या पालांवर पोहोचतात, जिथं अजूनही अंधार दाटलेला आहे," असं सांगताना समाजसेवक भारावून जातात.

रविवार, २२ जून रोजी या दीपयात्रेला एक नवा उजाळा मिळाला. हिंदवी परिवार, शिवछत्रपती तरुण मित्रमंडळ आणि आंबटपुरे परिवार यांच्या संयुक्त उपक्रमातून त्या पालांवरील मुलांना शालेय साहित्य, वह्या, पुस्तके आणि कपडे तर महिलांना साड्या, पुरुषांना पॅन्ट-शर्ट देण्यात आले. गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा प्रसंग अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.

या उपक्रमात डॉ. भगवंतराव वानखडे, दिलीप मेसरे, जय आंबटपुरे, राजु सहातोंडे, गजानन दहात्रे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. यावेळी संगीता ढोले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. वानखडे म्हणाले, "शासनाच्या योजना आपल्या जागेवर आहेत, पण खऱ्या अर्थानं समाज बदलतो तो सजग माणसांच्या कृतीमधून. संगीता ढोले यांच्या सारख्यांनी दिलेलं शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही – ते आयुष्य घडवणारं असतं!"

संगिता ढोले यांनी या कार्यक्रमाचं नियोजन स्वतः केलं आणि उपस्थित मुलांच्या चेहऱ्यांवरील हास्य पाहून त्यांच्याही डोळ्यांत समाधान दाटलं. हा केवळ एक उपक्रम नव्हता – हा होता परिवर्तनाचा आरंभ!

आज एक पोलीस कर्मचारी पालावर शिकवतेय, उद्या त्या मुलांतून शिक्षक, अधिकारी, समाजसेवक तयार होतील… आणि एक दिवस, अंधारलेल्या पालांवरूनही उजळलेलं भविष्य उगम पावेल – हीच आशा, हीच प्रेरणा!


आपणही बनू शकता या बदलाचे भागीदार – फक्त एक पाऊल पुढे टाका!



Post a Comment

0 Comments