सामर्थ्य, सेवा आणि समाजदायित्व... हेच आमचं ओळखपत्र !"
संपादक सुधाकर चौधरी–
नवी मुंबई,
महिलांच्या प्रगतीचा मंत्र जपणाऱ्या आणि ‘सामर्थ्य तिचं, आवाज तिचा’ ही भूमिका समाजापुढं उभी करणाऱ्या ‘रमाईच्या लेकी महिला विकास मंडळ, नवी मुंबई’ या कार्यकर्ती संस्थेला न्यू इरा हॉस्पिटलच्या वतीने दिला गेलेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या अथक कार्याला मिळालेली दादच होय.
हा गौरव राज्याचे वनमंत्री मा. श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात एका तेजस्वी सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने झगडणाऱ्या या मंडळाचे कार्य म्हणजे ‘समाजासाठी झिजणाऱ्या लेकरांचे उदात्त भान’. या पुरस्काराचा स्वीकार संस्थेच्या अध्यक्षा रेवतीताई आढाव, सचिव रेखाताई इंगळे, उपाध्यक्षा वंदनाताई नाईक आणि ज्येष्ठ पत्रकार संध्याताई बीडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
रमाईंच्या विचारांची नवी पिढी -सन्मानाने पुढे जाताना!"पुरस्कार स्वीकृतीनंतर रेवतीताई आढाव म्हणाल्या, “या सन्मानाने आमच्या कार्याला नवे बळ मिळाले आहे. हा पुरस्कार केवळ आमचा नाही, तर हजारो महिलांच्या संघर्षाला मिळालेली पावती आहे.”
पुरस्कार आमच्या कार्याचा नाही, तर समाजाच्या आशेचा आहे!"या वेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी मंडळाच्या कार्याचा उल्लेख करताना म्हटलं, “समाज बदलण्याची खरी शक्ती ही महिलांमध्येच आहे. ‘रमाईच्या लेकी’ मंडळ समाज परिवर्तनाच्या चळवळीत ज्या झपाट्याने काम करत आहे, ती ऊर्जा खरंच प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला पुढारी, पत्रकार, तसेच सामान्य महिलांचाही मोठा सहभाग होता. न्यू इरा हॉस्पिटलच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून दिला जाणारा हा पुरस्कार यंदा ‘रमाईच्या लेकी’ मंडळाला देण्यात आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी मोफत तपासणी शिबिरे, बचत गटांना प्रशिक्षण, हिंसाग्रस्त महिलांसाठी समुपदेशन, विधवांसाठी आर्थिक पुनर्वसन अशा अनेक उपक्रमांद्वारे ‘रमाईच्या लेकी’ मंडळ नवी मुंबई परिसरात आपली ठसा उमटवत आहे.
आज या संस्थेचा गौरव म्हणजे ज्या रमाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं, त्याच रमाईच्या विचारांची आजच्या काळातील सशक्त पिढीने घेतलेली शपथ मानावी लागेल.
0 Comments