मृत तनुजा खरात यांच्या कुटुंबास चार लाखांचा धनादेश; गंगाबाई लाटे यांना उपचारासाठी मदत
अनसिंग (ता. मंगरूळपिर) :
वाशीम-मंगरूळपिर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामभाऊ खोडे यांनी शनिवार, २१ जून रोजी अनसिंग गावातील खरात व लाटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा फटका बसून तनुजा अनिल खरात (वय १९) यांचा मृत्यू झाला होता, तर गंगाबाई लाटे (वय ४०) या गंभीर जखमी झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आमदार खोडे यांनी अनिल खरात यांना चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा निधी खाजगी मदतीतून देण्यात आला असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आणखी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाहीही आमदार खोडे यांनी यावेळी दिली. तसेच जखमी गंगाबाई लाटे यांच्या उपचारासाठी आवश्यक तेवढी मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
१२ जून रोजी सायंकाळी सुमारास तनुजा खरात व गंगाबाई लाटे शेजारच्या शेताजवळून पिण्याचे पाणी भरून परतत असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत तनुजा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंगाबाई गंभीर जखमी झाल्या. या नैसर्गिक आपत्तीमुळे खरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या भेटीदरम्यान बाजार समितीचे संचालक नत्थूजी कापसे, भाजपचे माजी शहराध्यक्ष राजकुमार मानधणे, माजी पंचायत समिती सदस्य बाळू माल, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सातव, चंद्रकांत ठाकरे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments