आयुष्मान भारत कार्ड उपक्रमात रास्तभाव दुकानदारांनी पुढाकार घ्यावा – तहसील प्रशासनाचा स्पष्ट संदेश
मंगरूळपीर (प्रतिनिधी) :
“आरोग्य हेच खरे धन” या तत्वाला चालना देत आयुष्मान भारत जन आरोग्य योजना आता खर्या अर्थाने गावोगावी पोहचवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांच्या आदेशानुसार मंगरूळपीर तालुक्यात विशेष कॅम्पद्वारे नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड मिळवून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेचे पायाभूत काम रास्तभाव दुकानदारांच्या माध्यमातून प्रभावीपणे पार पाडले जाणार आहे. “दुकानावर येणाऱ्या प्रत्येक गरजू ग्राहकाला योजना समजावून सांगावी, त्याला कॅम्पला पाठवावे आणि कार्ड काढण्यासाठी मदत करावी,” असे अन्नपुरवठा विभाग व तहसीलदार कार्यालयाने दुकानदारांना आवाहन केले आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब, शेतकरी, मजूर, हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतची मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे. गंभीर आजारांवरील उपचाराचा डोंगरासारखा खर्च शासन उचलणार असल्याने, “ही योजना म्हणजे खेड्यापाड्यातील जनतेसाठी जणू जीवनदायी ठरणार आहे,” असे स्पष्ट मत प्रशासनाने व्यक्त केले.
या सर्व उपक्रमाबाबत रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गजानन राऊत, पदाधिकारी सुधाकर चौधरी व निलेश पाटील यांनी दुकानदार बांधवांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “आरोग्य सुरक्षा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून, या योजनेतून आपल्या समाजातील प्रत्येक घर सुरक्षित झाले पाहिजे,” असे ते म्हणाले.
0 Comments