Ticker

6/recent/ticker-posts

विजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू तुलादान व शालेय साहित्य तुलादान


रिया राठोडच्या आयोजनाने रंगला मंगरूळपीरचा सामाजिक सोहळा 


मंगरूळपीर(सुधाकर चौधरी) :

मंगरूळपीर नगरीने सोमवारी एक अद्वितीय आणि हृदयस्पर्शी सोहळा अनुभवला. अविनाश शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकर्ते व संचालक, लोकमान्य सेवाभावी व्यक्तिमत्त्व असलेले विजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला लाडू तुलादान आणि शालेय साहित्य तुलादान हा उपक्रम खरोखरच सामाजिक जाणिवांचा आणि परंपरेचा संगम ठरला.


समाजहिताची दिशा देणारा उपक्रम

या सोहळ्यात लाडू तुलादान करून मान्यवरांचे स्वागत झाले, तर शालेय साहित्य तुलादानातून शेकडो गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची अमूल्य भेट मिळाली. फक्त वैयक्तिक आनंदापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता तो समाजहिताशी जोडण्याचा हा प्रयत्न असल्याने नागरिकांमध्ये उत्साह आणि कौतुकाची लाट उमटली.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. ना. राज्यमंत्री इंद्रनीलभाऊ नाईक यांनी भूषवले. मंचावर त्यांचा लाडू तुलादान करून सन्मान करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

मान्यवरांचा सहभाग

सभागृहात तालुका व जिल्ह्यातील सर्वच मान्यवरांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. अनिता ताई मनोहर नाईक, मोहिनी नाईक, चंद्रकांत ठाकरे, अनंतराव देशमुख, बाबाराव खडसे, आनंद जाखोटिया, पुरुषोत्तम चितलांगे, विजय शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई नाईक, आमदार श्याम खोंडे, शिक्षक संघ अध्यक्ष किरण सरनाईक, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप राव जाधव, वृषाली नाईक (हैदराबाद), शेषराव चव्हाण (नांदेड), मिलिंद नाईक (पुसद), किरण आडे (मुंबई), संजय राठोड (पुसद), राजूभाऊ राठोड सचिव (चेहेल) यांसारख्या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

रियाचे आयोजन ठरले आकर्षण

या भव्य सोहळ्याचे आयोजन सौ. मोसमी ताई राठोड आणि त्यांची कन्या कु. रिया राठोड यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले. रियाने दाखवलेला आत्मविश्वास, मंचावर केलेले मनमोकळे स्वागत, प्रत्येक कामातील नीटनेटकेपणा हे पाहून सभागृहातले सर्वच पाहुणे प्रभावित झाले.
मंचावर आलेल्या मान्यवरांनी रियाचे तोंडभरून कौतुक केले. एवढेच नव्हे, तर नागरिकांमध्ये कुजबुज सुरू झाली – “रिया आता राजकारणात पदार्पण करणार की काय?”

सामाजिक इतिहासातील सुवर्णक्षण

पाहुण्यांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांनी या वाढदिवस सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. दानधर्म, सामाजिक एकात्मता आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम मंगरूळपीरच्या सामाजिक इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणून नोंदला जाईल, यात शंका नाही.


Post a Comment

0 Comments