वाशिम | दिनांक – ११ ऑक्टोबर २०२५
गुड लाईफ फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या महिला विकास व उत्पादन कंपनी संदर्भात आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी वाशिम येथील जिल्हाधिकारी (कलेक्टर) साहेब यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.
या बैठकीत संस्थेच्या प्रतिनिधींनी महिलांना रोजगाराच्या संधी, व्यवसाय उभारणीचे प्रशिक्षण, तसेच स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. महिलांना उद्योगाच्या माध्यमातून सक्षम बनवण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने तो यशस्वीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
तसेच, महिला व बालकल्याण विभागाचे शिंदे साहेब यांनाही याच संदर्भातील निवेदन देण्यात आले. त्यांनी या उपक्रमाची दखल घेत स्तुतिस्पद पाठिंबा दर्शवला. संस्थेच्या वतीने त्यांच्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभारही मानण्यात आले.
या महत्त्वाच्या प्रसंगी
गीता वोरा, सुनीता ललित पाटील अनेकर ,संगीता लाटे, उमा वाघ, प्रीती देबरे आणि रेखाताई शिंदे या संस्थेच्या प्रमुख सदस्यांची उपस्थिती होती.
गेल्या काही वर्षांपासून गुड लाईफ फाउंडेशनमार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व उद्योजकीय उपक्रम राबवले जात आहेत. आता पुढील टप्प्यात महिलांसाठी स्वतंत्र उत्पादन कंपनी स्थापन करून त्यांना खऱ्या अर्थाने ‘उद्योजक’ बनवण्याचे लक्ष्य संस्थेने समोर ठेवले आहे.
हा उपक्रम वाशिम जिल्ह्यातील महिलांसाठी एक नवा उज्ज्वल अध्याय ठरेल, असा विश्वास संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
0 Comments