राळेगणसिद्धी (ता. पारनेर) : राज्यातील संघटन विस्ताराला नवे बळ देण्यासाठी लोक आंदोलन न्यासाने 21 फेब्रुवारी 2026 पासून पाच जिल्ह्यांचा महत्त्वाकांक्षी संघटन बांधणी व लोकशिक्षण-लोकजागृती दौरा जाहीर केला आहे. अकोला, वाशिम, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि बार्शी येथे होणाऱ्या बैठकींतून संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे.
या दौऱ्याला न्यासाच्या कार्याध्यक्षा श्रीम. कल्पना इनामदार यांचे नेतृत्व लाभणार असून, उपाध्यक्ष डॉ. कमल टावरी (माजी आयएएस, माजी सचिव भारत सरकार), खजिनदार दत्ता आवारी, विश्वस्त सुखदेव सिंह विक्र तसेच कार्यालयीन व्यवस्थापक अन्सार शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संघटन मजबुतीकरण, सभासद नोंदणी, आर्थिक आराखडा व सभासद फी रचना याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकींत अपेक्षित आहेत.
दौऱ्याची सुरुवात 21 फेब्रुवारी रोजी अकोला येथे मुक्कामाने होणार आहे. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अकोला शासकीय विश्रामगृह येथे पहिली बैठक होईल. त्यानंतर वाशिम येथे मुक्काम राहील. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडेल, तर दुपारी 3 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे दुसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे बैठक होणार असून, त्यानंतर धाराशिव येथे मुक्काम असेल. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव शासकीय विश्रामगृह येथे बैठक होईल आणि दुपारी 3 वाजता बार्शी शासकीय विश्रामगृह येथे दौऱ्याची सांगता करण्यात येणार आहे.
संबंधित जिल्ह्यांतील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी अनिवार्य उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्षांनी केले आहे. लोक आंदोलन न्यासाच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवून संघटनात्मक जाळे अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हा दौरा निर्णायक ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
0 Comments