जी. एच. रायसोनी विद्यापीठात रस्ता सुरक्षा जनजागृतीचा जागर
विद्यार्थ्यांसह शिक्षक-कर्मचाऱ्यांचा वाहतूक नियम पाळण्याचा संकल्प
अमरावती प्रतिनिधी : अनिता यादव
अमरावती : वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहरातील महामार्ग पोलीस विभाग, बडनेरा आणि जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठ परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत सुरक्षित वाहनचालना ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमास महामार्ग पोलीस विभाग, अमरावतीचे पोलीस निरीक्षक संदीप धोबे, नागपूर येथील अधिवक्ता डॉ. राजेंद्र गुंडलवार, महामार्ग पोलीस बडनेरा येथील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र इंगळे व गजानन देशमुख, जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल तसेच विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना रस्ता सुरक्षेविषयी समाजात व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संदीप धोबे यांनी शहरात सातत्याने वाढत असलेल्या अपघातांच्या चिंताजनक आकडेवारीकडे लक्ष वेधले. “आजचा विद्यार्थी असो किंवा सुशिक्षित नागरिक, भागदौडीच्या जीवनशैलीमुळे संयम हरवत आहे. गंतव्यस्थानी वेळेत पोहोचण्याच्या घाईत वाहन चालवताना अनेकजण वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अपघातांची संख्या वाढत आहे,” असे ते म्हणाले.
हेल्मेटचा वापर टाळणे, सीट बेल्ट न लावणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे, मद्यपान अथवा धूम्रपान करून वाहन चालवणे तसेच वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “वाहतूक नियम हे दंडासाठी नसून सुरक्षेसाठी आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताची जबाबदारी ओळखून नियमांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांनीही विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे आवाहन केले. “शिस्त आणि नियमपालन हीच खरी देशसेवा आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचा आणि सुरक्षित वाहनचालना करण्याचा संकल्प घेतला. राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी विशाल सपाटे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संयोजन केले.
रस्ता सुरक्षा अभियानाला बळकटी देणारा हा उपक्रम ठरला असून, अशा सातत्यपूर्ण जनजागृती कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
0 Comments