Ticker

6/recent/ticker-posts

कायदा राखणारेच कायदा मोडतात? वाशिम आरटीओ विभागाचा संतापजनक प्रकार?




प्रश्न विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी सोडल्याचा आरोप; परिवहन मंत्र्यांकडे तक्रार


वाशिम आरटीओ विभागाचा संतापजनक प्रकार?

मंगरूळपीर (जि. वाशिम) | प्रतिनिधीवाशिम आरटीओ विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना मंगरूळपीर येथे घडल्याचा आरोप समोर आला आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिक इरफान शेख यांना अधिकाऱ्यांनी गाडीत बसवून निर्जन ठिकाणी सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शेख यांनी थेट राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

“कारवाई दाखवते” म्हणत गाडीत बसवले?

शेख यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी आरटीओ अधिकारी धनवट यांना “सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आपण कारवाई का करत नाही?” असा प्रश्न विचारला. त्यावर “आम्ही कशी कारवाई करतो ते दाखवते” असे सांगत त्यांना अधिकाऱ्यांच्या वाहनात बसवण्यात आले. त्यानंतर मंगरूळपीर–कारंजा महामार्गावर वाहन दूरवर नेऊन निर्जन ठिकाणी थांबवण्यात आले.

त्यानंतर “मला पुढे काम आहे, तुम्ही इथेच उतरा,” असे सांगून शेख व त्यांच्या सहकाऱ्यांना वाहनातून उतरवण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार जीवितास धोका निर्माण करणारा असून एखाद्याच्या सुरक्षेशी खेळ करण्यासारखा असल्याचे शेख यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

प्रेस ओळखपत्र जप्त केल्याचा आरोप

इरफान शेख हे एका साप्ताहिकाचे शहर प्रतिनिधी असून त्यांनी अधिकाऱ्यांना आपले प्रेस ओळखपत्र दाखविल्याचे सांगितले आहे. मात्र संबंधित महिला आरटीओ अधिकाऱ्यांनी ते ओळखपत्र जप्त केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

समाजातून तीव्र प्रतिक्रिया

या घटनेनंतर विविध स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. “प्रश्न विचारणाऱ्या नागरिकाला अवैधरीत्या ताब्यात घेऊन निर्जन ठिकाणी सोडणे हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला शोभणारा नाही,” अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

परिवहन विभागाची ही कार्यपद्धती मनमानी कारभाराचे प्रतीक आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


परिवहन मंत्री काय निर्णय घेणार?

या गंभीर तक्रारीची दखल घेऊन परिवहन मंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने वस्तुस्थितीची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.


Post a Comment

0 Comments