पुणे, दि. २३ मार्च २०२६ : महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील समाज कार्यकर्त्या ज्योतीताई मनोज ठाकरे यांना “राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या गंज पेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सांस्कृतिक केंद्रात हा दिमाखदार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. मधुकर गायकवाड होते. तसेच मा. भानुप्रताप बर्गे, मा. रुक्मिणी गलांदे (ए.सी.पी.), मा. राजाराम धोंडकर, मा. शिवाजी कोळी, मा. सचिन दिनकर निवंगुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून मराठी सिने अभिनेत्री मा. दीपिका माथवड उपस्थित होत्या.
समाजसेवा, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्योतीताई ठाकरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक बदल घडून आला असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
पुरस्कार स्वीकारताना ज्योतीताई ठाकरे यांनी हा सन्मान आपल्या कार्याची पावती असल्याची भावना व्यक्त केली. मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सय्यद वसिम जाफर यांनी केले. या सोहळ्यामुळे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
0 Comments