Ticker

6/recent/ticker-posts

गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळांतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन उत्साहात संपन्न

मंगरूळपीर (प्रतिनिधी):
स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या समन्वयक प्रा. डॉ. सुषमा जाजु, अध्यक्ष प्रा. डॉ. अंजुम खान तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. तुषार कांबळे उपस्थित होते.
यावेळी समन्वयक प्रा. डॉ. सुषमा जाजु यांनी विद्यार्थिनींमध्ये अध्यापन कौशल्य विकसित व्हावे, आत्मविश्वास वाढावा तसेच नवीन तंत्रज्ञानाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्ष प्रा. डॉ. अंजुम खान यांनी प्रभावी पोस्टर प्रेझेंटेशनसाठी आवश्यक टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. प्रमुख अतिथी प्रा. तुषार कांबळे यांनी अभ्यासाला पूरक अशा कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्व असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले.

या प्रेझेंटेशनमध्ये बी.ए. भाग ३, भाग २ व भाग १ च्या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांनी बाल्यावस्थेतील वर्तन समस्या, किशोरावस्थेतील विकास, पालक-बालक संबंध, मुलांचे संगोपन, सामाजिक माध्यमांचा प्रभाव, जंक फूड, अपंग मुलांचे प्रकार, प्ले थेरपी, अन्नसुरक्षा, लेबलिंगचे महत्त्व अशा विविध विषयांवर उत्कृष्ट सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुषमा जाजु यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती भगत यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी मोरे यांनी केले.

या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे १६ विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला तर ३० विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला असून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला आहे.

— प्रा. डॉ. सौ. सुषमा जाजु
समन्वयक, गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
य. च. कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर
जिल्हा वाशिम

Post a Comment

0 Comments