Ticker

6/recent/ticker-posts

“कार्यालय नाही, पण जबाबदारी प्रचंड! मंगरूळपीर नगरपरिषदेत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड”

मंगरूळपीर नगरपरिषदेत उपनगराध्यक्षांना कार्यालय नाही; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप

मंगरूळपीर : जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेल्या उपनगराध्यक्षांनाच बसायला जागा नाही, अशी धक्कादायक आणि लाजिरवाणी परिस्थिती मंगरूळपीर नगरपरिषदेत उघडकीस आली आहे. तब्बल तीन महिने उलटूनही उपनगराध्यक्षांना स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, हा प्रकार प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि ढिसाळ कारभाराचा जिवंत पुरावा ठरत आहे.
शहरातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटणारे उपनगराध्यक्ष अनिल गावंडे यांना स्वतःसाठीच कार्यालय उपलब्ध नाही. त्यामुळे अखेर त्यांनी नगरपरिषद कार्यालयाच्या गेटसमोरच तात्पुरते “कार्यालय” थाटून जनतेची कामे सुरू केली आहेत. ही परिस्थिती पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “हे प्रशासन झोपले आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नगरपरिषदेत मुख्याधिकारी आठवड्यातून केवळ दोन दिवसच हजर राहत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेची कामे रखडत असून, नागरिकांची अक्षरशः हेळसांड होत आहे. शहरातील साफसफाईचे प्रश्न, प्रलंबित कामे आणि वाढत्या अडचणी याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

उपनगराध्यक्षांनी या सर्व बाबींची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या वेळी नगरसेवक सचिन, फैसल आणि अझर मिर्झा यांनीही प्रशासनावर ताशेरे ओढत, “कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा इशारा दिला आहे.
एकीकडे जनतेच्या समस्या डोंगराएवढ्या वाढत असताना, दुसरीकडे प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे चित्र मंगरूळपीरमध्ये पाहायला मिळत आहे. उपनगराध्यक्षांना कार्यालय न देणे हा केवळ दुर्लक्षाचा मुद्दा नसून, लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, की जनतेचा संताप उफाळून आल्यावरच हालचाल होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Post a Comment

0 Comments