“हागणदारीमुक्त” दाव्यांवर प्रश्नचिन्ह; नागरिक संतप्त, प्रशासनाविरोधात रोष वाढला
वाशिम, प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त गाव आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या गाजावाज्यात प्रशासन व्यस्त असताना दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात अस्वच्छतेचे भयावह चित्र समोर येत आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे, उघड्यावर शौचास जाणारे नागरिक, साचलेले सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे जनजीवन त्रस्त झाले असून “प्रशासन नेमके काम करते की फक्त मोहिमा आणि बैठका घेण्यातच धन्यता मानते?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
विशेषतः मंगरुळपीर शहर परिसरात बसस्थानकाजवळ, दारूबंदी कार्यालयाच्या मोकळ्या जागेवर आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. प्रवाशांना आणि नागरिकांना नाकाला रुमाल किंवा कपडा बांधून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रश्नांवर अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि संघटनांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे. वारंवार निवेदने, तक्रारी आणि आंदोलने करूनही परिस्थिती “जैसे थे” असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
“लाखो रुपये खर्च करून स्वच्छता अभियान राबवले जाते, जनजागृती केली जाते, बैठका घेतल्या जातात; मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर घाणीचे साम्राज्य दिसते. मग हे पैसे नेमके कुठे खर्च होतात?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि नगरपरिषदांकडून केवळ कागदोपत्री स्वच्छता दाखवली जाते का, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अंतर्गत जिल्हाभर मोहीम सुरू केल्याचा दावा केला आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत. विविध गावांमध्ये पाहणी, कचरा विलगीकरण, नाडेप खत खड्डे आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र शहर आणि गावांमधील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता प्रशासनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “नगरपालिका आणि नगरपरिषद जर थातूरमातूर काम करत असतील तर जिल्हा परिषद काय दिवे लावणार?” असा उपरोधिक सवाल नागरिक विचारत आहेत.
स्वच्छता मोहिमांच्या नावाखाली केवळ फलक, बॅनर आणि बैठका होत असताना प्रत्यक्षात नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे हे प्रशासनाचे अनियंत्रण आहे की संबंधित विभागाचा हलगर्जीपणा, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील 21 बाजारपेठेच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे प्रशासन सांगत असले तरी शहरांमधील अस्वच्छता, उघड्यावर कचरा आणि उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार थांबवण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
आता तरी प्रशासन झोपेतून जागे होऊन ठोस कारवाई करणार की पुन्हा एकदा स्वच्छतेच्या घोषणा आणि कागदोपत्री अहवालांपुरतीच मोहीम मर्यादित राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments