वाशिम | प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर इंधनाची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगाव नाका फाटा परिसरातील एका धाब्यावर महसूल विभागाने धडक कारवाई करत तब्बल २०० लिटर अवैध डिझेल साठा जप्त केला. या कारवाईमुळे इंधन माफियांचे धाबे दणाणले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी Vaishali Devkar आणि तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या विशेष पथकाने संबंधित धाब्यावर अचानक छापा टाकला. तपासादरम्यान सुनील धाडवे यांच्या मालकीच्या धाब्यावर मोठ्या प्रमाणात डिझेलचा अवैध साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान २०० लिटर डिझेल जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी हा साठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. संबंधित धाबा चालकाविरुद्ध नियमांनुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
सध्या जिल्ह्यात इंधन टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना काहीजण अवैध साठेबाजी करून नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांविरोधात पुढील काळात आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.
या धडक कारवाईमुळे अवैध इंधन व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
0 Comments