कोट्यवधींचा खर्च नेमका कुठे? मंगरुळपीर नगरपरिषदेवर नागरिकांचा संतप्त सवाल , इरफान शेख
मंगरुळपीर, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील प्रत्येक घरावर स्वच्छतेसंदर्भातील स्कॅनर, सर्वेक्षण आणि विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात शहरात अस्वच्छतेचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, उघड्यावर टाकला जाणारा कचरा, सांडपाण्याची समस्या आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून “हेच का स्वच्छ भारत अभियान?” असा संतप्त सवाल आता मंगरुळपीरकर विचारू लागले आहेत.
स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दाखवले जाते, विविध योजनांचे फलक लावले जातात, प्रत्येक घरावर स्कॅनर आणि नोंदी घेतल्या जातात; मात्र शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक भागांत दिवसेंदिवस कचऱ्याचे ढिग वाढत असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेषतः बसस्थानक परिसर, सार्वजनिक कार्यालयांच्या आसपासचा भाग आणि शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर अस्वच्छतेचे चित्र उघडपणे दिसून येत आहे. काही ठिकाणी सांडपाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे, तर उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकारही सुरूच आहेत. त्यामुळे नागरिकांना नाकाला कपडा बांधून प्रवास करावा लागत असल्याचे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे. “स्वच्छता मोहिमा फक्त फोटोसेशन आणि बैठकींपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत का?” अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
नागरिकांमध्ये तर उघडपणे अशीही चर्चा सुरू आहे की, स्वच्छतेसाठी येणारा निधी अधिकारी आणि ठेकेदारांच्या मिलीभगतीतून खर्च दाखवला जातो; मात्र प्रत्यक्षात कामे होत नाहीत. “अर्धे तुम्ही… अर्ध्यात आम्ही…” या चर्चेमुळे स्वच्छ भारत अभियानाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान जिल्हा परिषद आणि प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, सांडपाणी नियंत्रण आणि जनजागृती मोहिमांचे दावे केले जात आहेत. मात्र प्रत्यक्ष शहरातील परिस्थिती पाहता प्रशासनाचे दावे आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
“प्रत्येक घरावर स्कॅनर लावून स्वच्छतेच्या योजना दाखवण्यापेक्षा शहरातील कचरा उचलणे महत्त्वाचे नाही का?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील वाढती अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आणि प्रशासनाची निष्क्रियता पाहता संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि जबाबदार विभागांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मंगरुळपीर शहर खरोखर स्वच्छ होणार की स्वच्छ भारत अभियान केवळ कागदोपत्री आणि फोटोपूरतेच मर्यादित राहणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments