जीवनात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ स्वतःच्या प्रगतीपुरती मर्यादित राहत नाहीत; तर आपल्या कार्यातून, स्वभावातून आणि माणुसकीतून संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान बनतात. मंगरूळ नाथ नगरीतील आदरणीय श्री. हरीश बियाणे हे असेच एक उमदे, कार्यक्षम आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. आज त्यांच्या आणि सौ. प्रेरणा बियाणे यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारे काही शब्द समर्पित करताना मन अभिमानाने भरून येते.
कमी वयात उत्कृष्ट प्रगती करणे हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. त्यासाठी मेहनत, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि माणसं जोडण्याची ताकद लागते. हरीश बियाणे यांनी अत्यंत कमी वयात व्यापार, समाजकारण आणि मैत्री या तिन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी मिळवलेले यश हे केवळ आर्थिक नाही, तर माणसांच्या मनात निर्माण केलेला विश्वास हीच त्यांची खरी कमाई आहे.
मी आणि हरीश बियाणे गेली अनेक वर्षे एकत्र होतो. या काळात त्यांचा स्वभाव, त्यांची कार्यपद्धती आणि समाजासाठीची तळमळ जवळून पाहण्याचा योग आला. एखाद्या व्यक्तीला योग्य तो मान देणे, मोठ्या माणसांचा आदर राखणे आणि लहानांनाही आपलेसे करून सोबत घेऊन पुढे जाणे ही त्यांची खासियत आहे. “ज्याचा मान त्याला” ही भावना त्यांनी कायम जपली आणि त्यामुळेच प्रत्येक स्तरातील माणूस त्यांच्याशी आत्मीयतेने जोडला गेला.
आज अनेक युवक दिशाहीन होताना दिसतात; पण हरीश बियाणे यांनी युवकांना एकत्र आणून सकारात्मक ऊर्जेची एक सुंदर टीम तयार केली. समाजासाठी काम करणारी, धार्मिक आणि सामाजिक कार्यात तत्परतेने सहभागी होणारी ही युवकांची फळी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही टीम केवळ नावापुरती नसून प्रत्येक कार्यक्रमात सक्रियपणे कार्यरत असते.
चारभुजा नाथांचा जागर असो, बिरबलनाथ मंदिरातील धार्मिक कार्यक्रम असो, हनुमानजी मंदिरातील सेवा असो किंवा समाजातील कुठलाही सामाजिक, धार्मिक अथवा सांस्कृतिक उपक्रम असो — हरीश बियाणे आणि त्यांची टीम नेहमी पुढाकार घेताना दिसते. कोणत्याही कार्यक्रमात नियोजन, शिस्त, सेवा आणि उत्साह यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो. समाजातील कार्यक्रम आपलेच आहेत, ही भावना घेऊन ते आणि त्यांचे सहकारी अहोरात्र मेहनत घेतात.
श्री दामोदर जिनिंग प्रेसिंगचे संचालक म्हणून त्यांनी व्यापारी क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण केले. व्यापारी आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. व्यापार करताना माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणारा आणि व्यापाऱ्यांशी सुसंवाद राखणारा असा समतोल स्वभाव त्यांच्यात आहे.
राजस्थानी युवा मंडळाचे नेतृत्व करताना त्यांनी युवकांना केवळ संघटित केले नाही, तर समाजासाठी काम करण्याची प्रेरणाही दिली. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाणे, परंपरा आणि संस्कृती जपणे, सामाजिक ऐक्य टिकवणे आणि सेवा हीच खरी पूजा मानणे — या विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यातून स्पष्ट दिसतो.
मित्रासाठी जीवाला जीव देणारा माणूस म्हणजे हरीश बियाणे. आजच्या धावपळीच्या जगात खरी मैत्री टिकवणे अवघड झाले आहे; पण हरीश बियाणे यांनी मैत्रीला नेहमीच सर्वोच्च स्थान दिले. सुखातच नव्हे तर दुःखातही खंबीरपणे सोबत उभे राहणे, मित्रांच्या अडचणी स्वतःच्या समजून मदतीला धावून जाणे आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय नाती जपणे — ही त्यांची खरी ओळख आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच साधेपणा आहे. मोठेपणा असूनही अहंकार नाही, पद असूनही गर्व नाही आणि यश असूनही माणुसकी सोडलेली नाही. म्हणूनच समाजातील सर्व स्तरातील लोक त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात.
सौ. प्रेरणा बियाणे यांनीही त्यांच्या प्रत्येक प्रवासात खंबीर साथ दिली आहे. संसार, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांचा सुंदर समतोल राखत त्यांनी सहजीवन अधिक समृद्ध केले आहे. त्यांचे परस्परांतील प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
आज त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करताना ईश्वरचरणी एकच प्रार्थना —
त्यांचा संसार असााच सुखी, समृद्ध आणि आनंदमय राहो.
त्यांना उत्तम आरोग्य, भरभराट, दीर्घायुष्य आणि अखंड यश लाभो.
त्यांच्या कार्यातून समाजाला अशीच प्रेरणा मिळत राहो आणि युवकांना योग्य दिशा मिळत राहो.
💐 लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक : सुधाकर चौधरी
0 Comments