Ticker

6/recent/ticker-posts

“भाववाढीआधी डिझेल गायब… दरवाढीनंतर पंप सुरू! वाशिममध्ये कृत्रिम टंचाईचा संशय; डीएसओ कारवाई करणार का?”


वाशिम | प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यासह मंगरूळपीर तालुक्यात डिझेल दरवाढीपूर्वी अनेक पेट्रोल पंपांवर अचानक “डिझेल नाही”चे फलक झळकल्याने वाहनधारक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ट्रॅक्टरधारक, मालवाहतूक चालक आणि प्रवासी वाहनधारकांना डिझेलसाठी तासन्तास भटकंती करावी लागली, तर काही ठिकाणी नागरिक आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, डिझेलच्या भावात तीन ते चार रुपयांची वाढ होताच त्याच पेट्रोल पंपांवर अचानक डिझेल विक्री पुन्हा सुरू झाल्याने संपूर्ण प्रकारावर संशयाचे गडद सावट निर्माण झाले आहे. 

वाशिम जिल्ह्यात डिझेल दरवाढीपूर्वी अनेक पेट्रोल पंपांवर अचानक “डिझेल नाही”चे फलक झळकले आणि दरवाढ लागू होताच त्याच पंपांवर डिझेल विक्री पुन्हा सुरू झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकारामागे कृत्रिम टंचाई निर्माण करून आर्थिक फायदा उचलण्याचा डाव तर नव्हता ना? असा गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे.

पद्मभूषण अण्णा हजारे राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी यांनी या प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी (DSO) यांनी तातडीने चौकशी करून दोषी पेट्रोल पंपांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

चौधरी यांनी आरोप केला की, १०, ११, १२, १३ आणि १४ तारखेपर्यंत काही पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरेसा स्टॉक असूनही ग्राहकांना डिझेल उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, डिझेल दरवाढ जाहीर होताच अचानक त्याच पंपांवर डिझेल विक्री सुरू झाली. त्यामुळे या प्रकारामागे संगनमत आणि काळाबाजाराचा संशय व्यक्त केला जात आहे.

“सीसीटीव्ही फुटेज तपासा, स्टॉक रजिस्टर उघडा!”

या प्रकरणात संबंधित पेट्रोल पंपांचे सीसीटीव्ही फुटेज, स्टॉक रजिस्टर, विक्री नोंदी आणि टँकर पुरवठ्याची माहिती तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. “जर पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध होता, तर सामान्य नागरिकांना डिझेल नाकारले का?” असा थेट सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

दरम्यान, काही नागरिकांनी गंभीर आरोप करत “दरवाढ होणार असल्याची माहिती आधीच मिळाल्याने काही पंपधारकांनी मुद्दाम डिझेल साठवून ठेवले,” असा दावा केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“डीएसओ साहेब, कारवाई होणार की मौनच?”

या संपूर्ण प्रकारात जिल्हा पुरवठा विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, “संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकाराची कल्पना होती का?” असा सवाल आता जनसामान्यांमध्ये चर्चिला जात आहे. काही ठिकाणी “या प्रकरणात प्रशासनातील काही मंडळींचेही संगनमत आहे का?” अशी दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली आहे.

सुधाकर चौधरी यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की,
“१४ तारखेला ‘डिझेल नाही’ सांगणाऱ्या सर्व पेट्रोल पंपांची चौकशी करून जर कठोर कारवाई झाली, तरच जनतेचा प्रशासनावर विश्वास राहील. अन्यथा भ्रष्टाचाराला मोकळे रान मिळेल.”

तीन-चार रुपयांची दरवाढ आणि लगेच पंप सुरू… हा योगायोग की नियोजित खेळ?
या प्रश्नाने आता वाशिम जिल्ह्यातील वातावरण तापले असून, जिल्हा प्रशासन आणि डीएसओ कार्यालय या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments