“विद्यार्थ्यांच्या ताटातील घास कुणी लाटला? वाशिमच्या शिक्षण विभागात तांदूळ घोटाळ्याने खळबळ; प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली!”
वाशिम | सुधाकर चौधरी
वाशिम जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेत झालेल्या कथित हजारो टन तांदूळ घोटाळ्याने संपूर्ण शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, या धक्कादायक प्रकरणामुळे प्रशासनाच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या ताटातील घासच लाटला गेल्याचा संतप्त आरोप सामाजिक कार्यकर्ते विकास देविदास दाभाडे यांनी करत अमरावती विभागीय आयुक्तांकडे धडक निवेदन सादर केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सन २०१८ ते २०२५ या कालावधीत शासकीय व अनुदानित शाळांना वितरित करण्यात आलेल्या तांदळामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठित चौकशी समितीने १५ ते २० दिवस रेकॉर्डची सखोल तपासणी केली होती. या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे.
बनावट सही, डुप्लिकेट शिक्के, बनावट पावत्या; मोठा रॅकेट उघडकीस?
चौकशीदरम्यान अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बनावट सह्या, डुप्लिकेट शिक्के आणि बनावट पावत्यांच्या आधारे तांदूळ उचलल्याचे पुरावे समोर आल्याचे बोलले जात आहे. संबंधित पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे बीड येथील जगदंबा इंटरप्रायझेस या ठेकेदाराकडून कोट्यवधी रुपयांची वसुली झाल्याची चर्चा असताना, अद्यापपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल न झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
“घोटाळा सिद्ध झाला, मग आरोपी मोकाट का?”
घोटाळा स्पष्टपणे समोर आल्यानंतरही संबंधित ठेकेदाराला पुन्हा काम देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मागे कोणाचा वरदहस्त आहे? कोणत्या दबावाखाली कारवाई दडपली गेली? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
मीटर रूमची आग की पुरावे जाळण्याचा डाव?
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद कार्यालयातील मीटर रूमला लागलेल्या आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाल्याने या प्रकरणाला आणखी गूढ वळण मिळाले आहे. हा केवळ अपघात होता की पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला डाव? असा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्व रेकॉर्ड तातडीने ऑनलाईन करून त्याच्या प्रती विभागीय आयुक्त कार्यालयात सुरक्षित ठेवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
५ ते १० हजार टन तांदळाचा अपहार?
प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून उपलब्ध झालेला तांदूळ आणि प्रत्यक्ष शाळांपर्यंत पोहोचलेला साठा यांची तुलना केल्यास ५ ते १० हजार टन तांदळाचा अपहार उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा आकडा समोर आल्यास राज्यातील सर्वात मोठ्या शालेय पोषण घोटाळ्यांपैकी एक घोटाळा म्हणून या प्रकरणाची नोंद होऊ शकते.
एसआयटी चौकशीची जोरदार मागणी; जिल्ह्याचे लक्ष विभागीय आयुक्तांकडे
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते विकास दाभाडे आणि पत्रकार प्रशांत देवानंद तायडे हे २०१८ पासून सातत्याने करत आहेत. लोकसभा निवडणुका आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रकरण दडपल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, अप्पर आयुक्त श्री. जाधव यांच्या निदर्शनास बनावट पावत्यांसह प्रकरण आणण्यात आल्याने आता विभागीय आयुक्त या गंभीर आरोपांवर कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
“विद्यार्थ्यांच्या ताटातील घास लाटणाऱ्यांना अभय देणाऱ्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांतून उमटत आहे. वाशिमच्या शिक्षण विभागातील हा कथित तांदूळ घोटाळा आता प्रशासनासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.
0 Comments