अमरावती, प्रतिनिधी अनिता यादव :
जी. एच. रायसोनी विश्वविद्यालय (जीएचआरयू), अमरावती येथील स्कूल ऑफ लॉच्या वतीने एसोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) आणि अकॅडेमिक अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट सेंटर (एएडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक प्रौद्योगिकी विषयावरील पाच दिवसीय ऑनलाइन फैकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला.
‘फ्रॉम एलएमएस टू लर्निंग अॅनालिटिक्स : लेवरेजिंग एज्युकेशनल टेक्नॉलॉजीज फॉर अकॅडेमिक एक्सलन्स’ या विषयावर आधारित या कार्यक्रमात देशभरातील शिक्षक, संशोधक आणि शैक्षणिक प्रशासकांनी वेबेक्स प्लॅटफॉर्मद्वारे सक्रिय सहभाग नोंदविला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या उद्दिष्टांना अनुसरून आधुनिक डिजिटल शिक्षण तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि शिक्षकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात दररोज सरासरी १७० सहभागी उपस्थित होते. त्यामध्ये जीएचआरयूच्या स्कूल ऑफ लॉमधील ९ प्राध्यापकांचाही सहभाग होता. डिजिटल पेडागॉजी, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस), लर्निंग अॅनालिटिक्स, ई-कंटेंट विकास, ऑनलाइन मूल्यमापन पद्धती तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
स्कूल ऑफ लॉच्या डीन डॉ. नीता नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. असिस्टंट प्रोफेसर क्षितिजा देशमुख यांनी विभागीय समन्वयक म्हणून, तर असिस्टंट प्रोफेसर डॉ. रंजन दुबे यांनी संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली.
उद्घाटन सत्रात एआययूच्या जॉइंट सेक्रेटरी श्रीमती रंजना परिहार, विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. डॉ. विनायक एस. देशपांडे आणि कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले.
एफडीपीच्या पहिल्या दिवशी एनआयईपीएचे प्रो. के. श्रीनिवास यांनी ‘ब्लेंडेड लर्निंग व एनईपी २०२०’ तसेच ‘एलएमएस इव्होल्यूशन व ई-कंटेंट डिझाइन’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी लाइव्ह एलएमएस डेमोद्वारे आधुनिक डिजिटल शिक्षण प्रणालीची प्रत्यक्ष माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी डॉ. अतुल कुमार साहू आणि डॉ. ब्लेसी डो एम यांनी ऑनलाइन मूल्यमापनाच्या विविध रणनीती, क्विझ डिझाइन, असाइनमेंट तयार करणे आणि रुब्रिक्स विकसित करण्याबाबत व्यावहारिक प्रशिक्षण दिले.
तिसऱ्या दिवशी आयआयटी बॉम्बेचे शोध विद्यार्थी आदित्य राजमाने आणि सिस्टर निवेदिता युनिव्हर्सिटीचे प्रो. डॉ. सैकत माइती यांनी लर्निंग अॅनालिटिक्स, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाचे विश्लेषण या विषयांवर सत्रे घेतली. त्यांनी डेटा-आधारित अध्यापनाचे महत्त्व स्पष्ट केले.
चौथ्या दिवशी डॉ. अभिषेक डी. पटंगे यांनी प्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि शैक्षणिकदृष्ट्या जोखमीतील विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन केले. तसेच सुश्री सोयोनिका गोगोई यांनी विद्यार्थ्यांच्या वर्तणूक, भावनिक आणि संज्ञानात्मक अॅनालिटिक्सवर सविस्तर विवेचन केले.
पाचव्या आणि अंतिम दिवशी डॉ. संजय बंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) अॅक्ट २०२३ आणि सायबर सुरक्षिततेच्या पैलूंवर माहिती दिली. डॉ. नेहा दमानी यांनी एडटेक क्षेत्राचे भविष्य, व्यक्तिनिष्ठ शिक्षण आणि अनुकूलित अध्यापन पद्धती यावर विचार मांडले.
समापन सत्रात सहभागी शिक्षकांचा अभिप्राय नोंदविण्यात आला तसेच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कुलगुरू प्रो. डॉ. विनायक देशपांडे यांनी या उपक्रमाला “२१व्या शतकातील शैक्षणिक उत्कृष्टतेकडे नेणारे महत्त्वपूर्ण पाऊल” असे संबोधले.
या एफडीपीमुळे सहभागी प्राध्यापकांना एलएमएस, ई-कंटेंट विकास, डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया, प्रेडिक्टिव मॉडेल्स आणि नैतिक एआय वापर याबाबत व्यावहारिक समज प्राप्त झाली. शिक्षण क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना सहभागी शिक्षकांनी व्यक्त केली.
0 Comments