Ticker

6/recent/ticker-posts

सहा महिन्यांच्या गर्भवती विवाहितेला कथित विषप्रयोग; अकोल्यात खळबळ



रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज सुरू; तीन दिवस उलटूनही गुन्हा दाखल नसल्याने संताप

पोलीस प्रशासन पीडितेला न्याय देणार की आरोपींना अभय? जनतेचा सवाल

अकोला, प्रतिनिधी गजानन हरणे :

अकोला शहरातील खदान पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या राधिका गणेश भुसारी हिला तिच्या सासरच्या मंडळींकडून कथितरित्या विषारी द्रव्य पाजण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यापूर्वी घरामध्ये वाद सुरू असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी राधिकाच्या वडिलांना तातडीने फोन करून माहिती दिली.

माहिती मिळताच राधिकाचे वडील, भाऊ आणि काका अकोल्याकडे रवाना झाले. मात्र ते तेथे पोहोचेपर्यंत राधिकाची प्रकृती बिघडल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, सासरे विलास प्रल्हाद भुसारी, सासू दुर्गा विलास भुसारी आणि नणंद मनीषा अमोल चौरे यांनी संगनमत करून हा प्रकार घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच "मुलगीच होणार" या कारणावरून राधिकाचा सातत्याने छळ केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणानंतरही गेल्या तीन दिवसांपासून पीडितेचे वडील खदान पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, आरोपींचे संबंध एका प्रभावशाली राजकीय नेत्याशी असल्याची चर्चा परिसरात रंगत असून, त्याच राजकीय दबावामुळे कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

तथापि, या चर्चांमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जनतेचे थेट प्रश्न...

  • सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या कथित विषप्रयोग प्रकरणात अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही?
  • पीडित कुटुंबीयांना पोलीस ठाण्याच्या चकरा का माराव्या लागत आहेत?
  • राजकीय दबावामुळे कारवाई रोखली जात आहे का?
  • खदान पोलीस ठाणे निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का?
  • पोलीस प्रशासन पीडितेला न्याय देणार की आरोपींना अभय देणार?

एका गर्भवती महिलेच्या जीवाशी संबंधित असलेल्या या अत्यंत गंभीर प्रकरणाकडे आता संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पीडितेला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

न्यायाची प्रतीक्षा...

रुग्णालयात उपचार घेत असलेली राधिका जीवनासाठी संघर्ष करीत असताना, तिच्या कुटुंबीयांची नजर आता पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लागली आहे. या प्रकरणात सत्य बाहेर येणार का? दोषींवर कारवाई होणार का? की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार? याची उत्तरे येणारा काळच देईल.

(टीप : वरील सर्व आरोप तक्रारदारांनी केलेले असून, त्यांची सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल.)

Post a Comment

0 Comments