स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ ते ८ गुन्ह्यांची कबुली
वाशिम : सुधाकर चौधरी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती अवजारांवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३ लाख ४५ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी वाशिम जिल्ह्यातील ७ ते ८ चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कळंबा महाली शिवारातील शेतकरी प्रल्हाद आत्माराम महाले यांच्या शेतातून २ जूनच्या रात्री सोलरच्या ९ प्लेट चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी ५ जून रोजी वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी विशेष पथक तयार करून तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळ परिसरातील माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी विठ्ठल मंगलदास भगत (वय २३, रा. पंचशील नगर, वाशिम) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने प्रकाश रवि जाधव (वय १९, रा. गवळीपुरा, वाशिम) आणि गजानन विश्वनाथ कावरखे (वय ३०, रा. गोरेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह.मु. निमजगा, वाशिम) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चोरीतील दोन सोलर प्लेट, १०० कट्टे हळद (बेन), दोन मोटारसायकली आणि ७.५ एचपी क्षमतेचा मोटार पंप असा विविध गुन्ह्यांतील एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस तपासात आरोपींनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी ७ ते ८ चोऱ्या केल्याची कबुली दिली असून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वाशिम ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदिप अग्रवाल, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
चौकट
जप्त मुद्देमाल
- २ सोलर प्लेट – ₹६०,०००
- हळद (बेन) १०० कट्टे – ₹१,५०,०००
- २ मोटारसायकली – ₹१,००,०००
- ७.५ एचपी मोटार पंप – ₹३५,०००
एकूण मुद्देमाल : ₹३,४५,०००
0 Comments