नवी दिल्ली | सुधाकर चौधरी
देशातील लोकशाही मूल्यांचे संरक्षण, जनसहभाग वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांचे सशक्त राष्ट्रीय जाळे उभारणे आणि शेतकरी, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय तसेच लोकशाही विषयांवर व्यापक चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने लोक आंदोलन न्यासाच्या राष्ट्रीय अधिवेशन २०२६ अंतर्गत आज नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे देशभरातील शेतकरी संघटना, लोकचळवळींचे प्रमुख कार्यकर्ते आणि विविध राज्यांतील प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
देशातील विविध राज्ये आणि ३६ जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत न्यासाच्या कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांनी संघटन बांधणी, शेतकरी प्रश्न आणि लोकहिताच्या चळवळींची दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ३६ जिल्ह्यांच्या दौऱ्यातील अनुभव मांडताना त्यांनी सांगितले की, "तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकहिताची संघटना अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. शासनाकडून अन्याय होत असेल तर संघटनाच्या बळावर लोकशाही मार्गाने प्रभावी आंदोलन उभारून प्रशासनाला जबाबदारीने काम करण्यास भाग पाडू. समाजहिताच्या विरोधात जे काही घडेल त्याचा जाब विचारण्याची ताकद आपण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उभी करू."
बैठकीत न्यासाचे विश्वस्त व खजिनदार दत्ता आवारी यांनी ग्रामविकासामध्ये लोकसहभागाचे महत्त्व, प्रशासनातील पारदर्शकता, माहितीचा अधिकार आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या अधिवेशनात विविध राज्यांतील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, महिला, युवा कार्यकर्ते तसेच लोकचळवळींशी निगडित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटन विस्तार, लोकशाही मूल्यांचे रक्षण, शेतकरी प्रश्नांवरील राष्ट्रीय भूमिका आणि जनआंदोलन अधिक प्रभावी करण्याबाबत व्यापक चर्चा करण्यात आली.
लोक आंदोलन न्यासाच्या राष्ट्रीय अधिवेशन २०२६ मधून देशभरातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून लोकहिताच्या प्रश्नांवर अधिक संघटित, सक्षम आणि लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. देशभरातील सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, शेतकरी, युवक, महिला आणि सजग नागरिकांनी या लोकचळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
0 Comments