स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; रोख रक्कम, वाहन, बनावट पिस्तुले व शस्त्रांसह मुद्देमाल जप्त
कारंजा (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लक्ष्य करून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा पाच जणांच्या टोळीचा कारंजा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत सर्व आरोपींना अटक केली. या कारवाईत चोरीतील रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या धाडसी कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील पटणा जिल्ह्यातील बेलद रिटोला येथील रहिवासी तथा बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन (वय ३८) हे त्यांच्या वॅगनआर कारने रायपूरकडे जात होते. २७ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजता कारंजा लाड परिसरातील समृद्धी महामार्गावर थकवा जाणवल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून विश्रांती घेतली. त्यावेळी चार अज्ञात आरोपींनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील ५ हजार रुपये रोख, दोन ग्रॅम सोन्याचे कानातले आणि इतर मिळून सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून नेला.
या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८९/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३२४(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांची विशेष पथके तयार करून आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले.
तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे हर्षद पांडुरंग साबळे (रा. गजानन नगर, चिखली, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीकडून कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या इतर साथीदारांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी चेतन संजय माने, ओम सुरेश सपकाळ, धनंजय उजालसिंग कंमळीक आणि गोपाल श्रीकिसन मोरे (सर्व रा. चिखली तालुका, जि. बुलढाणा) यांना अटक केली. चौकशीत सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून ४,७५० रुपये रोख, होंडा व्हर्ना (एमएच-१४ डीएन-१२१३) चारचाकी वाहन, लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर (मंगरुळपीर) व मनीष ठाकरे (कारंजा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे तसेच कारंजा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर चोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पुढील तपास पोउपनि विशाल बोरकर करीत आहेत.
0 Comments