गुरु-शिष्य परंपरेचे जतन; कृतज्ञता दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान, पर्यावरण संवर्धनाचाही संदेश
मंगरूळपीर (सुधाकर चौधरी ) : संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करत ज्ञानकाशी इंग्लिश स्कूल, वाशिम रोड, गोलवाडी फाटा, मंगरूळपीर येथे गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपूजन तथा गुरूबंधन सोहळा आणि वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. "आधी गुरुशी वंदावे, मग साधन साधावे" या विचारांचा जागर करत गुरुचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान अधोरेखित करण्यात आले. तसेच "ऐसा चाहु राज मैं... जहाँ मिले सबन को अन्न..." या संत रविदास महाराजांच्या समतेच्या संदेशाचे स्मरण करण्यात आले.
या प्रसंगी ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका सौ. चंचल संजय खिराडे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुचे मार्गदर्शन किती आवश्यक आहे, यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमात शिक्षिका दिपाली घोटकर, संजिवनी मानवतकर, सुनिता घाटे, कोमल दवे, वैष्णवी येवले, तन्वी संघवी, अमोल शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच सुनिता वाघमारे, कल्पना पाटील, चंदा ठाकूर आणि चंचला पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
गुरुपूजन, गुरुबंधन आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलने भारतीय संस्कृती, गुरु-शिष्य परंपरा आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडवत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
"गुरुंच्या चरणी कृतज्ञतेचा भाव... वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प!"
0 Comments