Ticker

6/recent/ticker-posts

"आषाढी एकादशीनिमित्त नाथ सेवा फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम; शेकडो भाविकांना फराळाचे वाटप"


बिरबलनाथ महाराज संस्थानात प्रथमच उपक्रम; शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

मंगरूळपीर (शहर प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत भगवान विठ्ठलाच्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंगरूळपीर येथील ग्रामदैवत योगतपस्वी संत श्री. बिरबलनाथ महाराज संस्थान येथे नाथ सेवा फाउंडेशनच्या वतीने भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. दर्शनबारीतून साबुदाणा खिचडी व शेंगदाणा-गुळपट्टी या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून, शेकडो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात संत श्री. बिरबलनाथ महाराजांच्या आरतीने झाली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीची आरती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई रघूवंशी व सचिव श्री. रामकुमार रघूवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आषाढी एकादशीनिमित्त बिरबलनाथ महाराज संस्थानात प्रथमच फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आल्याने संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी नाथ सेवा फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

नाथ सेवा फाउंडेशन ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या माध्यमातून दर पौर्णिमेला सायंकाळी सात वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंब महाआरती आयोजित करून भाविकांना प्रसादाचे वितरण केले जाते. तसेच दरवर्षी संत श्री. बिरबलनाथ महाराजांचा जन्मोत्सवही भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो.

या उपक्रमांचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा व धार्मिक-सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संत श्री. बिरबलनाथ महाराज संस्थाननाथ सेवा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजेंद्र गुप्ता, राजेश भारस्कर, पुंडलिक गाडेकर, सागर कडूकार, गोपाल खिराडे, गौरी भारस्कर, दिदिया गुप्ता, सौ. उर्मिला गाडेकर तसेच नाथभक्तांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments