Ticker

6/recent/ticker-posts

कारगिलच्या वीर शहीदांना कृतज्ञ अभिवादन; मंगरूळपीरमध्ये माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल विजय दिन भावपूर्ण वातावरणात साजरा


माजी सैनिक संघटनेच्या पुढाकाराने कारगिल विजय दिन उत्साहात; प्रत्यक्ष युद्धात सहभागी माजी सैनिक नंदकिशोर मनवर यांनी सांगितल्या थरारक आठवणी

मंगरूळपीर, दि. २६ (सुधाकर चौधरी) : भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक ठरलेल्या कारगिल विजय दिनानिमित्त मंगरूळपीर येथील सार्वजनिक बौद्ध विहार, मिलिंदनगर (नवीन सोनखास) येथे माजी सैनिक संघटना, मंगरूळपीर यांच्या वतीने कारगिल युद्धातील अमर वीर शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कॅप्टन राजू मनवर यांच्या हस्ते तसेच हवालदार अरुण चक्रनारायण यांच्या हस्ते शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर शहीदांना मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा मंगरूळपीर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि कारगिल युद्धातील प्रत्यक्ष सहभागी माजी सैनिक नंदकिशोर मनवर यांनी कारगिल युद्धातील आपल्या अनुभवांना उजाळा देताना उपस्थितांना त्या काळातील अनेक चित्तथरारक प्रसंग सांगितले. कारगिल परिसरातील अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती, बर्फाच्छादित डोंगररांगा, प्रतिकूल हवामान आणि मर्यादित साधनसामग्री असतानाही भारतीय जवानांनी अदम्य साहस, शौर्य आणि देशभक्तीच्या बळावर शत्रूचा पराभव करून कारगिलच्या भूमीवर तिरंगा अभिमानाने फडकविल्याची प्रेरणादायी माहिती त्यांनी दिली.

यावेळी बोलताना नंदकिशोर मनवर म्हणाले की, "कारगिल युद्धाच्या काळात अनेक अडचणी, अपुरे साहित्य आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत भारतीय सैनिकांनी राष्ट्ररक्षणाचे पवित्र कर्तव्य पार पाडले. सैनिकांच्या पाठीशी देशातील जनतेचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद नसते, तर कारगिल विजय मिळविणे अधिक कठीण झाले असते. त्यामुळे भारतीय नागरिकांप्रती आम्ही सदैव कृतज्ञ आहोत." त्यांनी सर्व माजी सैनिकांनी संघटित होऊन समाजहिताचे कार्य करण्याचे आवाहनही केले.

यावेळी अशोक चौधरी, कैलास सावंत, तुकाराम खडसे, गांजरे साहेब, हरिभाऊ इंगोले, सुधाकर अर्जुने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आजी-माजी सैनिक, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमासाठी मानोरा तसेच परिसरातील विविध गावांमधून माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. उपस्थित सर्व माजी सैनिकांचे संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर मनवर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक खडसे यांनी केले, तर सुधाकर अर्जुने यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांचे विशेष सहकार्य

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदकिशोर मनवर, शालीग्राम सावंत, अशोक चौधरी, विजय इंगोले, सुधाकर अर्जुने (तालुकाध्यक्ष), पत्रकार रमेश मुंजे, विठ्ठलराव भगत, श्रीकृष्ण भगत, तुकाराम हजारे, विनायक खडसे, सुरेश कांबळे, सचिन बेलखडे, बबन मनवर, देवानंद कांबळे, सुदामराव अंबोरे, गौतम भगत, युवराज प्रधान, दिगंबर मनवर, देवानंद खाडे, सुनील मनवर, नागोराव खडसे, भीमराव मनवर, सुभाष इंगोले, भीमराव इंगोले, राजाराम राऊत, सविता मनवर, अन्नपूर्णा अर्जुने, शारदा मनवर, पुष्पाबाई भगत, ललिता भगत, नर्मदा भगत, रत्नमाला खडसे, शीतल इंगोले, रंजना इंगोले, शीला मनवर, शोभा मनवर, उज्वला भगत, रजनाबाई खाडे, गीताबाई ठोंबरे, शालू कांबळे, पंचशीला खडसे तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

"ज्यांनी प्राणांची आहुती देऊन तिरंग्याचा मान राखला... त्या अमर जवानांना मंगरूळपीरची अश्रुपूर्ण मानवंदना!"

Post a Comment

0 Comments