चंद्रकांत ठाकरे : ‘उत्सव आजादी का’ सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार
सुपखेला : सुधाकर चौधरी
शालेय जीवनात पुस्तकी अभ्यासासोबतच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्यास त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होऊन ते खऱ्या अर्थाने बहुआयामी बनतात, असे प्रतिपादन वाशीम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘उत्सव आजादी का’ या सांस्कृतिक स्पर्धेत यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा, सुपखेला, वाशिम येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार व अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत ठाकरे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञान मिळविणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कला व सांस्कृतिक क्षेत्रातही उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे. विविध छंद मंडळे, सांस्कृतिक उपक्रम आणि इतर सहशालेय गतिविधींमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे शिक्षणासोबतच अशा उपक्रमांना विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे प्राचार्य सी. एम. ठाकरे, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, पी. व्ही. पवळ, आर. आर. पडवाळ, जी. टी. मोरे, अश्विन चांदणे, ए. ए. गवळी यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. कार्यक्रमाची माहिती शाळेचे प्रसिद्धी विभागप्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी दिली.
0 Comments